नागपूर : कुटुंबावरील संकट दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेशी ओळखी वाढवून तिच्या घरात प्रवेश मिळवलेल्या भोंदूबाबाने महिलेसोबत अश्लिल कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
भोंदूबाबाने महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली होती. तसेच महिलेला त्याने नग्न पुजेचा व्हिडीओदेखील पाठविला होता. अखेर महिलेने हिंमत दाखवून पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
हबिबुल्ला मलिक उर्फ मामा उर्फ लाल बाबा उर्फ अनवर अली मुल्लीक (५५, प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो स्वत:ला तांत्रिक म्हणवून घेतो. तक्रारदार महिलेचा पतीशी घरगुती कारणांवरून बऱ्याच दिवसांचा वाद सुरू होता व ही बाब हबिबुल्लाला कळाली. त्याने मी तुझी समस्या तंत्रमंत्राने दूर करू शकतो असा दावा केला व महिलेशी ओळखी वाढवली. तो तिचा पती नसताना जानेवारी २०२४ पासून घरी येऊ लागला. त्याने तिला मेणबत्ती व दिवा लावून पुजा करतानाचा नग्न व्हिडीओ पाठविला होता व तुझ्यासाठीच हे तंत्रमंत्र सुरू असल्याचा दावा केला.
त्यानंतर त्याने घरी येत तिच्याशी लगट सुरू केली व काही वेळा तिच्यासोबत अश्लिल कृत्यदेखील करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांअगोदर त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हादरलेल्या महिलेने अखेर पाचपावली पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी हबिबुल्लाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
गुन्हे शाखेच्या पथक पाचने शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दोन पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुसांसह बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केले.
तरुणांनी गजबजणाऱ्या फुटाळा तलाव परिसरातील हनुमान व्यायाम शाळेसमोर आणि टिमकी दादरा पुलाचे जवळ अमोल मौंदेकर यांची घरासमोरील रस्त्यावर गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
पंकज उर्फ भल्ला भल्लाजी आत्राम (४४) आणि पुरुषोत्तम गंगाधर भगतकर (४४) अशी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने पंकजकडून देशी बनावटीची पिस्तूल आणि ३ जीवंत काडतूस, तर पुरुषोत्तमकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस ताब्यात घेतले. भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हे दाखल करीत गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी एकाला अंबाझरी तर दुसऱ्याला तहसील पोलिसांच्या स्वाधीन केले.