नागपूर : ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलेअर अट घालण्यात आली आहे. नॉन क्रिमिलेअरमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे ओबीसी मधून यूपीएससीत यश प्राप्त करताना अडचणी येत आहेत. या सर्व बाबींवर मात करत खेडूला कुणबी समाजातील एक युवक आयएएस अधिकारी बनला आहे.
अखिल खेडूला कुणबी समाजातून पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान रजत श्रीराम पत्रे यांना मिळाला आहे. अखिल खेडूला कुणबी समाज नागपूर यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
आशीर्वाद नगर, रिंग रोड म्हाळगी नगर चौक येथील समाज भवनात स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत लागलेले तसेच इतर प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व जगद्गुरू संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज व बळीराजा यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयएएस अधिकारी रजत श्रीराम पत्रे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र मान्यवराच्या हस्ते देण्यात आले.
या समारंभात विद्यार्थ्यांचे पालक व समाज बाधंव आणि भगिनी उपस्थिती होते. अध्यक्ष प्रभाकरराव पिलारे, उद्घाटक ॲड अनिल ठाकरे, प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक डॉ. प्रा. अभिविलास नखाते (संचालक शिवतीर्थ) विवेक तोंडरे (प्रशासकीय अधिकारी, संभाजी नगर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविक सचिव सुधाकर भर्रे यांनी केले. संचालन नंदकिशोर अलोणे व पायल पारधी यांनी केले. डॉ. प्रा. अभिविलास नखाते, विवेक तोंडरे आणि श्री रजत पत्रे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रजत पत्रे हे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथील आहेत.