नागपूर : विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवून देण्यासाठी उशिर होत असल्यामुळे भरधाव जाणाऱ्या स्कूलव्हॅनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वळणावर स्कूलव्हॅन उलटली. या अपघातात सहाही विद्यार्थी आणि व्हॅनचालकही जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी नवीन कामठीतील गरुड चौकात झाला. या अपघातामुळे पालकवर्गांत एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पालकांनी अपघातस्थळावर धाव घेतली. सर्व विद्यार्थी आणि वाहनचालकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूलव्हॅनचा चालक कैलास जीभकाटे (रा. खैरी-भीलगाव) हा सेंट जोसेफ शाळेच्या काही विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचे काम करतो. कैलासने नेहमीप्रमाणे आज सकाळी स्कूलव्हॅनमध्ये सहा विद्यार्थ्यांना घेतले आणि शाळेला उशिर होत असल्यामुळे घाईघाईने शाळेच्या दिशेने जात होता. मदन चौकातून गरुड चौकाकडे जात असताना वळणावर कैलासचे स्कूलव्हॅनवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे स्कूलव्हॅन एका खड्ड्यात घुसली. स्कूलव्हॅनचा वेग जास्त असल्यामुळे दोनदा उलटल्यामुळे स्कूलव्हॅनमधील विद्यार्थी घाबरले. या अपघातात सहाही विद्यार्थी जखमी झाले. या अपघाताची सर्वच विद्यार्थ्यांनी धास्ती घेतल्यामुळे ते रस्त्यावर रडत होते. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. स्कूलव्हॅनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी बाहेर काढण्यात आले.

सर्वच विद्यार्थ्यांना बराच मार लागलेला होता. एका विद्यार्थिनीच्या हाताला जबर मारला लागला. तसेच चालक कैलास जीभकाटे हासुद्धा गंभीर जखमी झाला. नागरिकांनी विद्यार्थ्यांना कँटोन्मेटंट रुग्णालयात दाखल केले तर स्कूलव्हॅनचा चालक कैलास याला खासगी रुग्णालयात दाखल केले. हा अपघात झाल्याच्या जवळपास तासाभरानंतर नवीन कामठी पोलीस आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. या अपघाताची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात घेण्यात आली. वाहतूक पोलीस नेहमी कर्तव्यावर हजर नसल्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असतात. वाहतूक पोलिसांचे रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करण्याकडे लक्ष नसून केवळ चौकात घोळका होऊन वाहनचालकांची लूट करण्यात मग्न असतात, अशी चर्चा या अपघातानंतर गर्दीत ऐकायला मिळाली.

पालकांची अपघातस्थळावर धाव

सेंट जोसेफ शाळेच्या स्कूलव्हॅनचा अपघात होऊन सहा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळताच पालकांनी लगबगीन अपघातस्थळाकडे धाव घेतली. काही विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी पाल्यांना जखमी अवस्थेत बघताच रडायला सुरुवात केली. मात्र, नागरिकांनी त्यांना धीर देऊन विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली.

गरुड चौकातील वळणावर स्कूलव्हॅनचा अपघात होऊन सहा विद्यार्थी जखमी झाले आहे. विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. वाहन अनियंत्रित होऊन खड्ड्यात गेल्यामुळे हा अपघात झाला आहे. प्रमोद पोरे, (ठाणेदार, नवीन कामठी पोलीस ठाणे)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur speeding school van overturned driver and six students injured adk 83 sud 02