गडचिरोली : पोलिसांनी छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे. यातूनच पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या केली. २ फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रक टाकले. त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिदुर्गम भागातील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमया केली. डिसेंबर महिन्यात पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले. त्यानंतर नेलगुंडा येथे ३० जानेवारीला पोलीस मदत केंद्र उघडण्यात आले. यामुळे छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात सहज प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांची नाकाबंदी झाली होती. नक्षल्यांच्या प्रभाव क्षेत्रात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था मजबूत होत असल्याने हिंसक चळवळीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, १ फेब्रुवारीला रात्री तीन नक्षल्यांनी कियेर गावातून माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी यांना उचलले व जंगलात नेले. तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली. मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात सुखराम मडावी हे पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाभरातील नक्षलवाद्यांनी केलेली ही पहिलीच हत्या आहे.

कंपनी क्र. १० वर संशय

भामरागड परिसरात माओवाद्यांच्या कंपनी क्र. सध्या ८ जण सक्रिय आहेत. त्यातील तिघांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तथापि, या भागात गेल्या काही वर्षांत पोलिसांनी नक्षल्यांविरोधात धडक कारवाया केल्या, त्यात जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर काहींनी आत्मसमर्पण केले.

मृत व्यक्ती पोलिसांचा खबरी नव्हता. मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकावरून तपास सुरू केला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites killed former panchayat samiti chairman sukhdev madavi accusing him of helping police ssp 89 sud 02