नागपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शहरात निघालेल्या मंडल यात्रेत गर्दीचा फायदा घेत घुसलेल्या पाकिटमारांनी नेत्यांचेच खिसे कापत लाखो रुपयांवर हात साफ केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे मंडल यात्रेसाठी येणाऱ्या नेत्यांमुळे चोख पोलीस बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या पहाऱ्यातच चोरट्यांनी नेत्यांचे खिसे कापले.

अनेक नेत्यांच्या खिशातून चोरांनी रोख रक्कम आणि पाकिटे लंपास केल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मंडल यात्रा शनिवारी व्हेरायटी चौकातून रवाना होणार होती. त्यासाठी नागपुरात आलेले शरद पवार हे व्हेरायटी चौकातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर येताच तेथील गर्दीचा फायदा घेत यात्रेत घुसलेल्या पाकीटमारांनी नेत्यांचे खिसे साफ केले.

ही यात्रा व्हेरायटी चौक मार्गे विदर्भातल्या जिल्ह्यांकडे रवाना होत होती. त्याच वेळी गर्दीत पाकीट मारत असताना एक चोर कार्यकर्त्यांच्या हाती लागला. कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोप देत पाकिटमाराकडून चोरलेले पाकिटही जप्त केले. कार्यकर्त्यांनी पाकिटमाराला पोलिसांच्या हवाली केले.

या घडामोडीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते दुनेश्वर पेठे यांच्या खिशातूनही पाकिटमारांनी रोख २० हजार रुपये लंपास केल्याची माहिती मिळत आहे. पेठे हे शरद पवार यांच्या दिशेने गर्दीतून जात असताना पाकिटमरांनी त्यांचा खिसा कापला.