लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : इमारतीच्या सातव्या माळ्यावरून खाली उडी घेऊन एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. मोईन शेख नौशाद शेख (१९) रा. संजीवनी सोसायटी, गणपतीनगर असे मृताचे नाव आहे.

मोईल बारावीनंतर नीट परीक्षेची तयारी करीत होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी मोईन शिकवणी वर्गाला जाण्यासाठी घरून निघाला होता. रात्री ८ वाजताच्या सुमारास तो आपल्या घरापासून जवळपास दीड किमी अंतरावरील गोधनी रेल्वेच्या सत्यम अपार्टमेंटमध्ये गेला. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानुसार, तो वाहन पार्क करून वर गेला आणि काही वेळातच खाली आला. काही क्षण खाली राहिल्यानंतर तो पुन्हा अपार्टमेंटमध्ये गेला. इमारतीच्या सातव्या माळ्यावर जाऊन त्याने खाली उडी घेतली. सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती सोसायटीचे नागरिक आणि पोलिसांना दिली. मानकापूर पोलिस घटनास्थळावर पोहोचले.

आणखी वाचा-महानिर्मितीच्या परीक्षेत तोतया उमेदवाराला अटक, पेपरफुटीची तक्रार मात्र नाही

मोईनला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जवळ मिळालेले कागदपत्र आणि वाहनाच्या माध्यमातून त्याची ओळख पटली आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. या घटनेचा शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल असा प्रश्न त्यांना पडला आहे. तो कोणत्या प्रकारच्या तणावातही नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्या मित्रांचीही विचारपूस केली. मात्र सर्वांनी मोईन शांत स्वभावाचा होता. तो केवळ आपल्या कामाशी काम ठेवत होता. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet student committed suicide by jumping from the seventh floor adk 83 mrj