नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. नागपुरातील सुरेश भट सभागृहात शनिवारी दुपारी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सरकार ‘निकम्मी ‘असल्याचे सांगत सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. नितीन गडकरी या कार्यक्रमात नेमके काय म्हणाले? याबाबत आपण जाणून घेऊ या.

विदर्भ एडव्हेंचर असोसिएशन, नागपूरतर्फे भट सभागृहात आयोजित ‘स्पोट्स ॲज ओ करियर सेमिनार’मध्ये नितीन गडकरी बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, चांगले दिवस सुरू असल्यास तोंडावर प्रशंसा करणारे अनेक लोक मिळतात. परंतु हे दिवस निघून गेल्यावर अडचणीच्या काळात कोणीही विचारत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात मेहनत घेऊन प्रत्येकाने चांगले करियर घडवायला हवे. मी फायनान्शियल तज्ज्ञ, लेखापाल नाही. परंतु चांगला फायनान्शिलय समूपदेशक आहे. मी पाच लाख कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते- पुलाचे काम हातात पैसे नसतांनाही करतो.

नागपुरात मला ३०० स्टेडियम तयार करण्याची इच्छा आहे. परंतु शासकीय यंत्रणेकडून अडचणी येतात. सरकार ही निकम्मी गोष्ट आहे. सरकारच्या अखत्यारित असलेली महापालिका, नागपूर सुधार प्रण्यास वा इतर संस्था काही कामाच्या नाही. या सगळ्या यंत्रणा चालू गाडीला पंक्चर करण्याचे काम करते. त्यामुळे दुसऱ्या पद्धतीने काम करवून घ्यावे लागते. माझ्याकडे एक दुबईचा व्यक्ती आला. तो तेथे स्टेडियम चालवत होता. त्याला आता नागपुरातील स्टेडियमसाठी कंत्राट काढण्याचे काम दिले. त्यानुसार मैदान, तेथे पाणीसह इतर सोयी व बांधकाम शासन करेल. परंतु ते उत्तमरित्या चालवण्यासह त्याच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. त्यासाठी तो येथे विविध खेळासाठी येणाऱ्या तरुणांकडून माफक शुल्क आकारेल. येथे कुणालाही फुकट सोय द्यायला नको. कारण फुकट गोष्टीची कुणालाही किंमत नसते. पैसे देऊन संबंधित व्यक्ती प्राणाणिकपणे मेहनत घेतो, असेही गडकरी म्हणाले.

राजकारण हा फुकट्यांचा बाजार…

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणाबाबतही महत्वाचे भाष्य केले. गडकरी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. राजकारण हा फुकटांचा बाजार आहे. राजकारणांकडून फुकटात काय मिळणार? यासाठीच प्रयत्न केले जातात.

सांस्कृतिक महोत्सवात वर्षाला तीनदा लाठी चार्ज

नागपूरात आम्ही प्रत्येक वर्षी सांस्कृतिक महोत्सव भरवत असतो. त्याला हजारोंची गर्दी होते. प्रत्येक वर्षी येथे तीन वेळा लाठीचार्ज होतो. पूर्वी आम्ही प्रत्येक नेत्यांना पास वाटत होतो. त्यातला कुणी व्यक्ती यायचा- कुणी गैरहजर  रहायचा. परंतु आता वर्तमानपत्रात क्यूआर कोड प्रसिद्ध करतो. त्यावर स्कॅन करून नागरिक स्वत:चे आरण आरक्षीत करतो. त्यातून आता अनुचित प्रकार कमी झाल्याचेही गडकरी म्हणाले.