नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकप्रियता सातासमुद्रापल्याड आहे. विरोधकांमध्येही तेवढेच आदराचे स्थान आहे. तेवढेच श्रोतेही त्यांना ऐकण्यास उत्सुक असतात आणि याचे कारण म्हणजे त्यांच्या भाषणातील धमाल किस्से. प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी लता मंगेशकर आणि नागपुरात येण्यास त्यांनी दिलेला नकार याचा असाच एक किस्सा सांगितला.

नागपुरात लता मंगेशकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या. त्यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात गोंधळ झाला आणि त्यानंतर लता मंगेशकर यांनी कान टोचले की, “मी नागपुरात आता कधीच येणार नाही”. पण नागपुरकरांना त्या हव्या होत्या. त्यावेळी प्रकाश देशपांडे म्हणाले, आपण त्यांना नागपुरात आणयचेच.

नागपूर महापालिकेचे तत्कालीन महापौर अटलबहादूर सिंग आणि कुंदाताई विजयकर पण त्यांना नागपुरात आणण्यासाठी मागे लागल्या. सगळे हट्टाला पेटले आणि मला मात्र संकोच होत होता. एकदा हृदयनाथ आले आणि प्रकाशने मला त्यांच्याकडे विषय काढायला सांगितला. हृदयनाथ म्हणाले दीदी ऐकणार नाही. लता मंगेशकर व माझी भेट घालून देण्यासाठी प्रकाशने हृदयनाथांना पटवले. राम शेवाळकर आणि मनोहर म्हैसाळकर यांचे मंगेशकर कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंध आहेत.

त्यांच्याच मदतीने मी दीदीच्या घरी गेलो. त्यांना म्हणालो, “गोंधळ घालणारे आता असतील, नसतील. त्यांची शिक्षा आम्हाला का देता? महापालिकेकडून आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नागपुरात यावेच लागेल”. लता मंगेशकर मानल्या, पण त्यांनी एक अट घातली. ” मी नागपुरात येईल, पण मी गाणार नाही”. मी म्हणालो, “असं तर होणार नाही, तुम्ही येणार आणि गाणे होणार नाही”.

पण त्या अटीवर ठाम होत्या आणि ती अट मान्य करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर लता मंगेशकरांसह अवघे मंगेशकर कुटुंबीय नागपुरात आले. नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर नागपूर महापालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. लता मंगेशकर नागपुरात आणि गाणे होणार नाही, असे कसे? त्यांच्या अटीनंतरही अटलबहादूर सिंग यांनी हिम्मत केली आणि लता मंगेशकर यांना गाण्याची विनंती केली. त्यावेळी समोर तमाम नागरिक असताना त्यांना आग्रह मोडता आला नाही आणि लता मंगेशकरांनी एक गाणे गायले. लता मंगेशकरांचा नागपुरात न येण्याचा प्रण नितीन गडकरी यांच्यामुळे मोडला गेला. त्या नागपुरात आल्या आणि गायल्यासुद्धा.