अमरावती: काश्मिरातील पहलगाममधील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ आज शुक्रवारी अमरावतीत कडकडीत बंद पाळण्‍यात आला. या बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्‍य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दुकाने बंद होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील राजकमल चौकात निदर्शने केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहलगाम येथे मंगळवारी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. येथील राजकमल चौकात विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. पहलगाम भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी निरपराध जिवांचा बळी घेतला आहे. हा हल्ला निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात पावले उचलावीत, असे आवाहन निवेदनात करण्यात आले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने याप्रकरणी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सामूहिक हनुमान चालिसा पठाण देखील यावेळी करण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसण्याची नव्हे तर पाकिस्तानला नकाशावरून काढून टाकण्याची वेळ आली अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

राजकमल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते दुचाकीवर स्वार होऊन निघाले. या दुचाकी मोर्चाच्या समोर ट्रॅक्टर ट्रॉलीवर पहलगाम येथे शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गाने निघालेला दुचाकी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या बाजारपेठेत बंद दरम्यान शुकशुकाट होता.

राजकमल चौक ते गांधी चौक या आणि जवाहर गेट ते सराफा हा या सर्वात गर्दीच्या परिसरात बाजारपेठ बंद असल्याने या भागातील मुख्य रस्ता मोकळा दिसत होता. जयस्तंभ चौक, सरोज चौक, प्रभात चौक, शाम चौक, राजापेठ, गाडगेनगर, मध्यवर्ती बस स्थानक परिसर या सर्वच भागात व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.

अमरावती बंद दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी अमरावती शहर पोलीस सज्ज होते. राजकमल चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक, सराफा बाजार, कॉटन मार्केट चौक या भागात पोलीस तैनात होते. राजकमल चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pahalgam terror attack strict shutdown in amravati to protest against terrorist attack mma 73 dvr