नागपूर : वेगवेगळे उत्सव, सण साजरे होत असताना त्यांच्यामागे सामाजिक प्रबोधनाची झालर होती. मात्र. गेल्या काही वर्षांत उत्सवांच्या आयोजनामागील उद्दिष्टच बदलत गेले. उत्सवांचे राजकीयीकरण होऊ लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी उत्सवांमधून राजकीय नेते निर्माण होत होते. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी उत्सवच बळकावले आहेत. त्यात दहीहंडीचा उत्सव सुटलेला नाही. जन्माष्टमीनिमित्त सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सोहळ्याला आता राजकीय झालर निर्माण झाल्यामुळे उद्या, बुधवारपासून नेत्यांचे राजकीय शक्तिप्रदर्शनासोबत लाखमोलाच्या दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा – “उद्योगपतीधार्जिन्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी देणे-घेणे नाही,” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या असल्या तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध भागांत दहीहंडी स्पर्धांच्या आयोजनांसाठी विविध राजकीय पक्ष सरसावले असून या निमित्ताने विदर्भात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, जन्माष्टमीच्या पंधरा दिवस आधीच त्याची तयारी सुरू झालेली असून शहरातील विविध भागांत विविध राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक, आमदारांपासून पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग लागले असून त्यात लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सहाही विधानसभा मतदारसंघात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असले तरी काही माजी नगरसेवकांनी स्वतंत्रपणे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी शहरात मोठमोठे होर्डिंग लावले असून, लाखो रुपयांची या दहीहंडी स्पर्धेसाठी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

शहरातील काही दहीहंडी तर विशिष्ट राजकीय पक्षाच्या नावाने ओळखल्या जात आहेत. शहर आणि ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट व उद्धव ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी यावेळी पुढाकार घेतला असून त्यांनी आता सुरुवात केली आहे. बडकस चौक, मानेवाडा, इतवारी, गोकुळपेठ, रविनगर, अंबाझरी, वर्धमाननगर, नरेंद्रनगर, श्रीकृष्ण नगर, खामला, नंदनवन, सक्करदरा, वर्धमाननगर यासह रामटेक, काटोल आणि उमरेडमध्ये दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धांमध्ये कामठी, रनाळा, इतवारी, दहीबाजार आणि आसपासच्या खेड्यातील अनेक चमू स्पर्धा जिंकण्यासाठी हिरिरीने सहभागी होत असतात. मध्य नागपुरात बडकस चौकात तर पूर्व नागपुरात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून वेगवेगळ्या चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इतवारीमध्ये संजय खुळे यांच्या स्मृतिनिमित्त दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे.

हेही वाचा – नदीचे खोलीकरण, रुंदीकरण कोण करणार? चंद्रपूर पालिका आणि पाटबंधारे विभाग आमनेसामने

नागपूर जिल्ह्यात अधिकृत १६ गोविंदा पथके असली तरी अनेक संस्था यानिमित्ताने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत असतात. यंदाही गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी जाण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण भागातील गोविंदा पथकांनी रात्र जागवून उंच मानवी मनोरे रचण्याची तालिमही सुरू केली आहे. परिणामी, दरवर्षीप्रमाणे ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याची चुरस गोविंदा पथकांमध्ये दिसणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी शहर व जिल्ह्यात महिलांचे पथक तयार झाले असून त्याही वेगवेगळ्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करत असून त्यामागे कुठलेही राजकीय शक्तिप्रदर्शन नाही. सर्वच पक्षाचे व विविध जातीधर्माचे लोक टेलिफोन एक्सचेंज चौकात होणाऱ्या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. – बाल्या बोरकर, माजी नगरसेवक, भाजपा नेते

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politicization of the dahi handi festival and preparations for a show of strength by the leaders vmb 67 ssb