नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या महा एल्गार मोर्चामुळे ३२ तास तुंबलेल्या नागपूर- हैदराबाद महामार्गावरची वाहतूक कोंडी अखेर गुरुवारी सकाळी फुटली. तिसऱ्या दिवशी वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. या घडामोडीत परसोडीतल्या कापूस संशोधन केंद्राशेजारील मैदानात रात्रभर शड्डू ठोकून बसलेल्या कार्यकर्त्यांना पावसाने चांगलेच भिजवले. निवाऱ्याची कसलीही सोय नसल्याने रात्र भर भिजलेले कार्यकर्ते सकाळ होताच विखुरले.
नागपूरच्या सिमेला लागून असलेल्या ग्रामीण भागातली १० मंगल कार्यालये, समाजभवनांमध्ये कार्यकर्त्यांची तात्पुरती सोय करण्यात आली. त्यामुळे चिंब भिजलेले कार्यकर्ते जवळचे मंगलकार्यालय गाठण्यासाठी विखुरले. या घडामोडीत परसोडीतल्या आंदोलनस्थळावरील मैदानात पावसामुळे चिखलाचा खच निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांना बसण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे गुरुवारच्या चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रहारच्या आंदोलनानंतर २४ तासांपासून महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीची दखल घेत नागपूर खंडपीठाने बुधवारी तातडीने महामार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्याचा सन्मान करत प्रहारने रस्ता मोकळा केला असला तरी आंदोलनाची भूमिका सोडलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
जरांगे पाटील यांची एन्ट्री
या घडामोडीत मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी सकाळीच आंदोलनात एन्ट्री घेतली. नागपुरात पोचताच जरांगे पाटील परसोडी येथील आंदोलनस्थळी दाखल झाले. मात्र पावसामुळे कार्यकर्त्यांची सोय खापरी पूनर्वसित गावातल्या समाजभवनात केल्याचे कळताच, ते तिथेही पोचले. कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांनी सायंकाळपर्यत धीर धरा असा सल्ला त्यांना दिला.
एकले तर गांधीगिरी नाही तर भगतसिंगगीरी
शेतकरी- दिव्यांगांचे प्रश्न चर्चेतून सोडवायला सरकार तयार असेल, तर गांधीगिरीतून शांततेच्या मार्गाने सरकारशी तडजोड केली जाईल. मात्र सरकार जर न्यायालयाला पुढे करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला भगतसिंग गिरीनेही उत्तर देता येते, असे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथून आलेले महादेव डाके आणि लक्ष्मण गरड या दिव्यांगांनी बोलून दाखवले.
महिन्याभराची शिदोरी गाठीला
सातबारा कोरा करा, दिव्यांगांना १० हजार निर्वाह भत्ता द्या, या व अन्य अशा २० मागण्यांसाठी ताकद एकवटत प्रहारचे महा एल्गार आंदोलन मराठा आंदोलनाप्रमाणे लांबले तर खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, यासाठी तयारीनिशी मैदानात उतरलेल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी महिनाभर पुरेल इतकी शिदोरी गाठीला बांधून सोबत आणली आहे.गेल्या पाच दिवसांपासून गाव सोडलेले विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते रस्त्यावरच चूल मांडत आहेत.
