अमरावती : अचलपूर मतदार संघातील १० कोटी रुपयांचा विकास निधी मोर्शी मतदारसंघात वळवण्यात आल्याचा आरोप आपल्यावर केला असला तरी हा निधी आपण नव्हे तर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच शासनाला पत्र देऊन वळवला आहे, असा आरोप भाजपचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी केला आहे.

प्रवीण तायडे म्हणाले, अचलपूर मतदारसंघातील दहा कोटीपेक्षा अधिक रुपयाचा निधी हा मोर्शी  विधानसभा मतदारसंघात वळवल्याचा आरोप आपल्यावर केला जात आहे. प्रत्यक्षात बच्चू कडू यांनीच पराभवानंतर अचलपूर मतदारसंघातील कामांचा निधी हा मोर्शी  मतदारसंघात वळवला आहे. बच्चू कडू यांनी यासाठी २९ मे २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले आहे.

तायडे यांनी बच्चू कडू यांच्या लेटरहेडवर देण्यात आलेले पत्र देखील पुरावा म्हणून सादर केले. या पत्रात बच्चू कडू यांनी दहा कोटींच्या निधीची कामे रद्द करून सुधारित कामे मोर्शी मतदारसंघात वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे, असेही तायडे म्हणाले.

ही आमदारांची निष्क्रियता-प्रहारचा आरोप

राज्यात सरकार तुमचे आहे, मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत, तर मग निधी पळतोच कसा? असा प्रतिप्रश्न प्रहारच्या वतीने आमदार प्रवीण तायडे यांना विचारण्यात आला. बच्चू कडू यांच्या पत्रावरून निधी मोर्शी, वरुडला वळविण्यात आल्याचा त्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचेही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील एका वर्षात बच्चू कडू यांनी मतदारसंघात साडेआठशे कोटींचा निधी आणला. याउलट विद्यमान आमदारांनी किती आणला हे जनतेलाही कळून चुकले आहे. बच्चू कडू यांनी आणलेला निधी अन्य मतदारसंघात वळता करण्याविषयी कुठलेही पत्र दिलेले नसून आमदारांनी सादर केलेले पत्र बनावट लेटरहेड वापरून तयार करण्यात आल्याचा आरोप प्रहारने केला आहे. अचलपूरचे आमदार हे जनतेची दिशाभूल करीत आहेत बच्चू कडू यांची सही असल्याचे पत्र आमदार प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषदेत दाखविले, मात्र या बनावट पत्राबाबत आम्ही लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे प्रहारचे पदाधिकारी ऋषिकांत श्रीवास, प्रदीप बंड आदींनी सांगितले.

राज्यात सरकार तुमचे असताना निधी दुसऱ्या मतदारसंघात कसा वळतो, हा एक प्रश्नच असून स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी विद्यमान आमदार हा सर्व खटाटोप करित असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला.