नागपूर : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीला फायदा होईल, यासाठी साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत ५० हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणात हिंगणा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीक्षा ताजणे यांना मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

साधीदाराने खुद्द न्यायालयासमक्ष ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ सरकारी वकील सरोज खापर्डे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत वानाडोंगरी येथे घडलेल्या विनयभंग प्रकरणात मंगळवारी आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. यातला साक्षीदारही न्यायालयात उपस्थित होता.

दरम्यान साक्षीदाराने न्यायालयात सांगितले, की पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ताजणे यांनी आपल्याला गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी मागितली. तापैकी ताजणे यांना २० हजार रुपयेही दिल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले. ज्येष्ठ सरकारी वकील खापर्डे यांनी याची न्यायालयाकडे तक्रार केल्यानंतर सदर पोलिसांच्या मदतीने ताजणे यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधीत गुन्हा हिंगणा पोलीस हद्दीत घडल्याने सदर पोलिसांनी ताजणे यांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या पथकाकडे सुपूर्द केले.

काय घडला होता गुन्हा

वानाडोंगरीतील नीट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत तवेरा कार चालकाने विनयभंगाचा प्रकार केला होता. कारमध्ये बसलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याचे चित्रिकरण करत ही चित्रफित मुलीच्या कुटुंबियांना एकवली. त्यानंतर तवेरा चालक लिलाधर मनसराम समर्थ (३७) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातला साक्षीदार हा पिडीत मुलीचा नातेवाईकही आहे. त्याच्याकडेच पोलीस उपनिरीक्षक ताजणे यांनी मागितल्याचे साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले.

”ज्येष्ठ सरकारी वकिलांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई झाली आहे. प्रकरण हिंगणा पोलीस हद्दीत घडल्याने संबंधित अधिकाऱ्यांना परिमंडळ दोनच्या पथकाकडे सुपूर्क करण्यात आले आहे. ” – -अमोल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर ” या प्रकरणातला

आरोपी आधीच पोलिसांच्या अटकेत आहे. साक्षीदाराने न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे तुर्तास ताजणे यांना ताब्यात घेतले असले तरी बुधवारी अधिकाऱ्यांसमक्ष तपास केला जाईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल. -जितेंद्र बोबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंगणा