लोकसत्ता टीम

यवतमाळ : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रोजमजुरी करून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी व्हायचेच या जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा (तांडा) येथील बहीण-भावाने कठोर परिश्रमातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. मोठ्या बहिणीची पशुसंवर्धन पर्यवेक्षकपदी तर लहान भावाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पुष्पा पंचफुला माणिक राठोड आणि नीलेश पंचफुला माणिक राठोड अशी या यशस्वी भावंडांची नावे आहेत.

ब्राह्मणवाडा (तांडा) येथे अपुऱ्या सोयी, सुविधांत जगणाऱ्या पुष्पा आणि नीलेश यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण पूर्ण केले. घरात अठराविश्व दारिद्र्य असताना रोजमजुरी करून आई-वडिलांनी मुलांना शिकविले. परिस्थितीची जाणीव ठेवत मुलं महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आली. अशातच घराचा आधार असलेले वडील माणिक राठोड यांचे २०१५ मध्ये निधन झाले. आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि ती अंथरूणाला खिळली. दोन्ही भावंडांनी यवतमाळ येथे मिळेल ते काम करून शिक्षण सुरू ठेवले. आपली परिस्थिती बदलवायची असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याशिवाय पर्याय नाही, हे या भावंडांना उमगले आणि त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली.

आणखी वाचा-चंद्रपूर : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू

शिकवणी लावायला पैसे नसल्याने घरूनच अभ्यास करून परीक्षा दिल्या. घराची संपूर्ण जबाबदारी असल्याने नीलेश कधी रंगकाम, कधी गवंडी काम, कधी यात्रेत तिकीट विक्री करायचा, तर पुष्पा दुकानात काम करून घरी आर्थिक हातभार लावयची. आईची प्रकृती चांगली व्हावी म्हणून तिच्यावरही विविध ठिकाणी उपचार सुरू केले. हे सर्व करत असताना घरीच नियतिपणे सात ते आठ तास अभ्यास करून सरकारी नोकरीसाठी अर्ज करू लागले. अनेक विभागाच्या परीक्षा दिल्या. नीलेशने पोलीस खात्यात जायचे ठरवून अभ्यासासोबतच शारीरिक क्षमतेकडेही लक्ष दिले. या काळात दोन्ही भावंडांना मित्र मंडळीने आपल्यापरीने सहकार्य केले.

आणखी वाचा-नागपूर : प्रेयसीच्या घरातच थाटली ड्रग्सची प्रयोगशाळा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात नीलेश राठोड याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. तर चंद्रपूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या सरळसेवा भरतीत पशुसंवर्धन पर्यवेक्षक म्हणून पुष्पा राठोड हिची नियुक्ती झाली. पुष्पाचा निकाल २९ जुलैला तर नीलेशचा निकाल १ ऑगस्टला जाहीर झाला. सख्खे बहीण, भाऊ चार दिवसांच्या फरकाने शासकीय नोकरीत लागल्याने राठोड कुटुंबीय आणि ब्राह्मणवाडा (तांडा) या गावात आनंद व्यक्त होत आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणतेही यश मिळवू शकतो, असा विश्वास पुष्पा आणि नीलेश यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.