वर्धा : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा चित्रपट लोकप्रिय झाल्यानंतर त्याची पुष्पा ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. तसेच त्यांचे हातवारे, अभिनय व संवाद पण गाजले. त्याचीच थोडी चेहरेपट्टी असलेले मग अनेक कॉपी करू लागले. पण एक चांगलाच लोकप्रिय झाला. तो म्हणजे अजय मोहिते.

अजय मोहिते प्रसिद्ध यूट्यूबर व सोशल मीडिया इंफ्लूएन्झर म्हणून परिचित असून इंस्टाग्रामवार त्यांचे लाखो चाहते आहे. त्याने अनेक प्रयत्न करीत खुद्द अल्लू अर्जुन यांच्याशी हैदराबाद येथे घेतलेली भेट पण गाजली. आता मात्र अजय उर्फ पुष्पा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. त्याचा मोठा भाऊ विजयने भररस्त्यात घातलेला धिंगाणा व त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

याबद्दल खुद्द अजय मोहिते म्हणतो की माझी खेड्यातील एका झोपडीतून झालेली वाटचाल व आज साधलेली प्रगती सर्व परिचित आहे. गावातून मी आईवडील भाऊ, बहीण यांना वर्ध्यात आणले. ते सर्व सुखात असावे असा माझा प्रयत्न असतो. मी सोशल मिडीयावर व्यस्त असल्याने माझं फर्निचरचे दुकान मी विजयला चालविण्यास दिले. पुढे हे दुकान व गावची शेती नावावर करून देण्यासाठी त्याने भांडण सूरू केले. पण दुकानात त्याने घोळ करून ठेवल्याने त्याने त्रास देणे सूरू केले. शेवटी त्याची पोलीस तक्रार केली. पण घरगुती वाद म्हणून दखल घेतल्या गेली नाही. पण या घटनेत त्याने हद्द केली. रस्त्यावर धिंगाणा घातला. माझ्या नावे बोंबा ठोकल्या. आई व वडिलांस मारहाण केली. माझ्या साळ्यास भोसकले. म्हणून त्याची तक्रार पण पोलिसांकडे केली. आता त्यास अटक झाली आहे, अशी माहिती पुष्पा उर्फ अजय मोहिते यांनी दिली.

अजय मोहिते हा आई-वडील, पत्नी व बहीण यांच्या सोबत राहतो. मात्र मोठा भाऊ विजय याने सुरू केलेला धुडगूस त्याला मनस्ताप देणारा ठरत असल्याचे दिसून आले. इंस्टाग्रामवार ते चांगलेच लोकप्रिय असून त्यांच्या व्हिडीओची संख्या अडीचशेवर पोहचली आहे. त्यास लाखोंचा प्रतिसाद लाभला आहे.

या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांना देशाच्या विविध भागातून निमंत्रणे येत असतात. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात अजयची ओळख, माझा वर्धेकर मित्र, अशी करून दिली होती. तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी पदोपदी केलेल्या सहकार्याबद्दल अजय मोहिते हे अनेकदा कृतज्ञता व्यक्त करून चुकले आहे. ‘ पुष्पा ‘ साकारण्याची त्यांची हातोटी सर्वत्र दाद घेऊन जात असते.