अकोला : अवैध सावकारी प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणात अवैध सावकाराच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये चांगलीच वाढ होत आहे. अकोला शहरात अवैध सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात प्राप्त झाली होती. या तक्रारीवरून अवैध सावकार अक्षय विनायक मानकर (रा. मलेरिया कॉलनी, पावसाळे लेआऊट, कौलखेड, अकोला) यांचेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये धाड कारवाई करण्यात आली.
पथक प्रमुख दीपक सिरसाट, पथक सहायक श्रद्धा देशमुख, एम. आर. सोनुलकर, एम. वाय. परतेकी, एन. एस. गोरे आदींच्या चमूने छापा टाकला. अक्षय मानकर याच्याकडून ५०० रुपयांचे मुद्रांक, संमतीलेख-१, १०० रुपयांचा मुद्रांक, धनादेश, वाहनविक्रीचा करारनामा छायाप्रत, स्थावरचे खरेदी छायाप्रत आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस बंदोबस्त व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. अवैध सावकारी प्रकरणात छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांभोवती अवैध सावकारीचा फास
दरम्यान, जिल्ह्यात अवैध सावकारीचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला जात आहे. नैसर्गिक संकट व उत्पादित शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांवर अवैध सावकारांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येते. वेळेत कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्यास अवैध सावकारीतून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत.
स्थावर मालमत्ता मिळाल्या परत
अवैध सावकारी प्रकरणात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून अवैध सावकारी विरोधात नियमित छापा कारवाई करण्यात येते. त्या अंतर्गत आतापर्यंत कार्यालयामार्फत अवैध सावकारीमध्ये बळकावलेल्या एकूण १५१.६४ एकर शेतजमीन, चार हजार ७७६ चौरस फूट जागा, एक राहता फ्लॅट १६३.५० चौ. मी. जागा संबंधितांना परत करण्यात आली आहे. आतापर्यंत २१९ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ६२ प्रकरणामध्ये फौजदारी गुन्ह्याची नोंद झाली असून १२४ प्रकरणात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम-१६ व १८ (१) अन्वये चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात १९७ अधिकृत सावकार
अकोला जिल्ह्यात अधिकृत सावकारांची संख्या १९७ आहे. सर्वाधिक सावकार अकोला तालुक्यात आहेत. अकोला १११, बार्शिटाकळी १२, पातूर सात, बाळापूर २८, तेल्हारा पाच, अकोट १६ व मूर्तिजापूर १८ असे एकूण १९७ सावकार आहेत.