नागपूर : महाराष्ट्राच्या पूर्वेकडील शेवटचा जिल्हा असलेल्या चंद्रपूर रेल्वे स्थानकाबाबत भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधांची तरतूद करण्यास मध्य रेल्वेने मंजुरी दिली असून, चंद्रपूर येथून गाड्यांची सुरूवात व मेल/एक्सप्रेस गाड्यांचे विस्तार याबाबत असलेल्या सातत्यपूर्ण जनतेच्या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे विद्यमान पायाभूत सुविधा सुधारतील तसेच प्रवाशांचे सुलभतेने प्रवास होईल आणि या भागातील परिचालन अडचणी दूर होतील.
सध्या कमी वापरात असलेले चंद्रपूरचे गुड्स शेड आता उच्चस्तरीय प्रवासी प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित केले जात आहे, ज्यामुळे स्थानकाची कोचिंग क्षमता वाढेल. तसेच, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूस देखील नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम करण्यात येत असून, त्यामुळे एकूण प्लॅटफॉर्मची संख्या आठ होणार आहे. या विस्तारामुळे प्रवासी वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन होईल व एकूण रेल्वे संचालनात सुधारणा होईल.
हे प्रकल्प सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या यार्डवरील गती मंदावणारी गर्दी कमी करण्यात मदत करेल, जे सध्या प्रवासी व मालवाहतूक दोन्ही हाताळते. चंद्रपूर स्थानकाचे टर्मिनलमध्ये रूपांतर झाल्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्याशी मालगाड्यांचे आदान-प्रदान अधिक सुलभ होईल आणि वेळपालन व कार्यक्षमतेत वाढ होईल. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर शहरातून मुंबई व पुणे या शहरांसाठी थेट गाड्यांची सातत्याने मागणी करण्यात येत असून, हा विकास त्या दीर्घकालीन अपेक्षेला उत्तर देईल.
चंद्रपूर येथे कोचिंग टर्मिनल सुविधा होणार असल्याने चंद्रपूर जिल्ह्याची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. चंद्रपूर येथून मुंबई, पुणे आणि इतर शहरांसाठी गाडी सुरू केल्या जाऊ शकतील. सध्या चंद्रपूर आणि बल्लारशहा, गडचिरोली येथील प्रवाशांना एकतर वर्धा किंवा नागपूर येथून मुंबई, पुण्यासाठी गाडी पकडावी लागते. कोचिंग टर्मिनलमुळे चंद्रपूरहून थेट मुंबई, पुणे, दिल्ली शहरासाठी गाडी सुरू करता येईल. या भागातील प्रवाशांना थेट गाडी मिळाल्यास त्यांचा त्रास वाचणार आहे.
प्रवाश्यांसाठी सुलभता आणि सोयीसाठी दिव्यांग अनुकूल शौचालये, टॅक्टाइल पाथवे, कोच इंडिकेशन बोर्ड आणि एकात्मिक प्रवासी माहिती प्रणाली अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.