नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या प्राचीन रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेला एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. न्यायालयीन आदेशानंतर रेल्वेने एक कोटीची रक्कम जमा देखील केली. मात्र, आता ते झाड रक्तचंदनाचे नसून त्याची किंमत केवळ अकरा हजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रेल्वेने न्यायालयात अर्ज दाखल संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पुसद तालुक्यातील खर्शी गावातील शेतकरी केशव शिंदे यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्याची भरपाई मिळाली, मात्र रक्तचंदनाचे झाड, इतर झाडे आणि भूमिगत पाईपलाईनचा मोबदला नाकारण्यात आला. ८ फेब्रुवारी २०१८ रोजी पुसदच्या भूमी अधिग्रहण अधिकाऱ्याने झाडे व पाईपलाईनच्या मोबदल्याचा दावा फेटाळला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करण्यात आला, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी झाडे व पाईपलाईनचे मूल्यांकन करून योग्य मोबदला देण्याचा आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.
न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यावर रेल्वेने नुकसान भरपाई म्हणून एक कोटी जमा केले. न्यायालयाने यापैकी ५० लाख रुपये काढण्याची परवानगी शेतकऱ्याला दिली तसेच उर्वरित रक्कम झाडाच्या मूल्यांकनानंतर काढता येईल, असे स्पष्ट केले. जर मूल्यांकन कमी आले तर त्यानुसार याचिकाकर्त्यांना देय रक्कम दिली जाईल, आणि जास्त असल्यास उर्वरित रक्कम रेल्वेला न्यायालयात जमा करावी लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
यानंतर बंगळुरू येथील एका संस्थेमार्फत शास्त्रीय तपास करून अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात संबंधित झाड बीजासालचे असून त्याची किंमत केवळ अकरा हजार असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वेतर्फे ॲड. नीरजा चौबे यांनी हा अर्ज दाखल केला असून लवकरच न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
व्याजासह रक्कम परत करा
अहवाल प्राप्त झाल्यावर रेल्वेने नुकसान भरपाईची रक्कम परत देण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला. शेतकऱ्याने योग्य व्याजासह सर्व रक्कम परत करावी, अशी मागणी रेल्वेने केली आहे. रक्तचंदनाला चीन, जपान, सिंगापूरसह जगात मोठी मागणी आहे. हे अतिशय दुर्लभ झाड आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान शेतकऱ्याने या झाडाची किंमत पाच कोटी असल्याचा दावा केला होता. आता न्यायालयत याप्रकरणात काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.