अमरावती : आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या अपयशावर सातत्याने भूमिका मांडत आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा युवकांच्या बेरोजगारीचा विषय, सरकारमधील मंत्र्यांच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार, त्यावर आक्रमकपणे बोलत आहोत. सरकार कुठे चुकत आहे, नेमके काय चालले आहे, हे लोकांना कळावे, म्हणून आपण मुद्दे मांडत आहोत. त्यामुळेच मला अडचणीत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
सोलापूर जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे काल अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात रोहित पवार हे मास्टरमाईंड आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला, त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, या प्रकरणात सरकारने वाटल्यास एसआयटी मार्फत चौकशी करावी, त्या ठिकाणी खरे काय घडले, हे लोकांसमोर यायला हवे. जर एखादी व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल, तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही. पण, या प्रकरणांमध्ये घटनाक्रम कशा पद्धतीने घडला, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. सोलापूर पोलिसांनी एक अहवाल तयार केला आहे.
याचा अभ्यास केला, तर पीडित व्यक्ती शरणू हांडे याला एका बियर शॉपीतून उचलण्यात आले होते. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलीस प्रशासनाचेच म्हणणे आहे. शरणू हांडे हा गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता आहे. अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. शरणू हांडे याने अमित सुरवसे याला ३० जूनला बेदम मारहाण केली होती. त्याची चित्रफितही उपलब्ध आहे. हांडे याने ती समाज माध्यमांवर प्रसारीत केली, त्यामुळे अमित सुरवसे याच्या भावना दुखावल्या असतील. हे दोघेही पुर्वीपासून एकामेकांना ओळखतात. जर कालच्या प्रकरणात अमित सुरवसे हा जबाबदार असेल, तर त्याच्यावर कारवाई व्हावी. पण अमित सुरवसे याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीस कारवाई करणार का, असा आमचा प्रश्न असल्याचे रोहित पवार म्हणाले.
गोपीचंद पडळकर हे आज त्या ठिकाणी पोहचले, त्यावेळी रुग्णालयात माऊली हळणवर हा भाजपचा पदाधिकारी हांडे यांच्या कानाजवळ जाऊन काहीतरी सांगतो आणि त्यानंतर हांडे हा माझे नाव घेतो, यातून मला या प्रकरणात गोवण्याचे भाजपचे षडयंत्र दिसून येते, असा प्रत्यारोपही रोहित पवार यांनी केला. मला अडचणीत आणण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मी सरकारच्या विरोधातील भूमिका सातत्याने मांडत राहणार, असे रोहित पवार म्हणाले.