RSS Centenary Celebration: नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव सोडायला सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित झालेले आहेत. शताब्दी सोहळ्यासाठी विदेशातील पाहुण्यांची उपस्थिती हे मोठे आकर्षणाचे केंद्र आहे.
विदेशी पाहुण्यांना कार्यक्रम पूर्ण अनुभवता यावा, सरसंघचालक यांचे भाषण त्यांना कळावे यासाठी भाषांतर करणाऱ्या हेडफोनची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. संघाच्या शताब्दी वर्षात पहिल्यांदाच इतकी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रमासाठी जवळपास १५ हजारावर नागरिकांची उपस्थिती आहे. रेशीमबाग परिसरात संघमय वातावरण झालेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव रेशीमबाग मैदानावर सुरू झाला आहे. अर्धशतकाहून अधिक कालखंडापासून संघात जाणाऱ्यांपासून आताच्या पिढीतील तरुणांपर्यंत शेकडो स्वयंसेवक या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाचे साक्षीदार झाले आहेत.
विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा आहे. या उत्सवात देशातील आणि देशाबाहेरील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, घाना यासारख्या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच राजकीय आणि उद्योग जगतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आहे.