बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील फरदापुर टोल नाक्याजवळून २२ ऑगस्टच्या सायंकाळी सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने लुटून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मेहकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आज अखेर पाच आरोपीना अटक केली असून जवळपास अडीच किलो सोने जप्त केले आहे.

आजवरच्या कालावधीत अकोला येथून एक तर मध्य प्रदेश मार्गे राजस्थानमध्ये जाऊन राजस्थान येथून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील आरोपी हे टॅक्सी सोनाराच्या दुकानात काम करणारे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावरील फरदापुर टोल नाक्याजवळ मुंबई येथील सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आले. व्यापाऱ्याजवळील पावणे पाच किलो सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. विशेष म्हणजे सराफा व्यवसायिकाचा चालक हा देखील लुटीमध्ये सहभागी होता. घटनेनंतर हा चालक दरोडेखोरासोबत पसार झाला होता.

याची माहिती मेहकर पोलिसांना मिळाल्यानंतर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. मेहकर पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग केला केला असता अकोला जिल्ह्यातील पातुरजवळ त्यांना लूटी मध्ये वापरलेले वाहन मिळून आले. दुसऱ्या दिवशी अकोला येथून एक आरोपी अटक करण्यात आला त्यानंतर पोलिसांचे तीन पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक यांनी मध्यप्रदेश मार्गे राजस्थान गाठले. त्या ठिकाणी चार आरोपींना अटक करण्यात आली.

अटक झालेले सर्व आरोपी तिशीच्या आतील आहे. यामध्ये विजयसिंग रामसिंग साखला (वय २६, रा. खुमानपुरा तालुका वल्लभनगर जिल्हा उदयपुर राज्य राजस्थान), शिवसिंह लालसिंह झाला (वय २६, रा. रतनपुर किसराय तालुका वल्लभगनर जिल्हा उदयपुर,राजस्थान) , शैतानसिंह भैरवसिंह कितावत (वय २५, रा. मोंडा तालुका मावली जिल्हा उदयपुर राजस्थान), रतनसिंह अमरसिंह सारंगदेव(रा. बाठेडा वल्लभनगर जिल्हा उदयपुर राजस्थान) , शंकरसिंह जोधसिंह डुलावत (वय २८ वर्षे, रा. नयाघर, मंदियाना, तहसील नाथद्वारा, जिल्हा राजसमंद राजस्थान) अशी आरोपीची नावे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सर्व आरोपी हे एकमेकांच्या संपर्कातील असून आरोपी खाजगी वाहन चालक तर दोन आरोपी हे सोनाराच्या दुकानात काम करणारे आहेत. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस विभाग सूत्रांनी वर्तविली आहे. या प्रकरणी पोलीस विभागाला पुन्हा एकदा राजस्थान गाठावे लागण्याची दाट शक्यता आहे.