नागपूर: सायबर गुन्हेगार पूर्वी सामान्य नागरिकांनाच लक्ष्य करीत आर्थिक फसवणूक करीत होते. मात्र, आता चक्क वरिष्ठ पोलीस अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या रडारवर असून अनेकांच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून पैशाची मागणी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील २१ आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट तयार केल्याची माहिती समोर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झटपट पैसै कमवण्याचा सोपा मार्ग म्हणून सायबर गुन्हेगार हॅकींग, सेक्स्टॉर्शन, क्लोनिंग, मॉर्फिंग यासह एटीएम-क्रेडिट कार्डची माहिती मागणे किंवा पासवर्ड मागून फसवणूक करीत होते. सामान्य नागरिक अलगद त्यांच्या जाळ्यात अडकत होते. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तपासाच्या नावावर वेळ मारून नेली जाते. तक्रारदारांवर सायबर पोलीस आगपाखड करीत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्याबाबत दोष देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी थेट आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. यामध्ये चक्क राज्याच्या पोलीस महासंचालकांचाही समावेश आहे. आतापर्यंत तब्बल २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट बनवून मित्र, नातेवाईकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांची फसवणुकीसह आता चक्क पोलीस अधिकाऱ्यांचीही फसवणूक होत असल्याचे सत्य समोर आले आहे.

‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून फसवणूक

राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे महफूज अजीम खान (उत्तरप्रदेश) याने ‘फेक फेसबुक’ अकाऊंट बनवले होते. तर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आयुक्त कृष्ण प्रकाश, विश्वास नागरे-पाटील, आयपीएस एम. राजकुमार, चंद्रकांत गवळी, राकेश ओला आणि तेजस्वी सातपुते या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. अनेक कनिष्ठ अधिकारी, नातेवाईक आणि मित्रांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून आर्थिक मदत म्हणून काही रक्कम मागण्यात आली होती.

फेसबुकवर बनावट खाते तयार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकसह इतर समाज माध्यमांचा जपून वापर करावा. कुणीही फेसबुकवरून पैशाची मागणी केल्यास थेट फोन करून खात्री करावी. फेसबुक खाते वापरताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. – अमित डोळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Several incidents of cybercriminals creating fake accounts of senior police officers and demanding money adk 83 dvr