अकोला : अंतर्गत गटबाजी व स्थानिक नेतृत्वाकडून पक्षावर एकहाती वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नात शिवसेना शिंदे गटाची अकोला जिल्ह्यात पडझड होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.

‘स्थानिक’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाराज व कुंपणावरील नेते, कार्यकर्त्यांच्या पक्षांतरावर जोर आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला फारशी पकड मजबूत करता आलेली नाही. पक्षाच्यावतीने विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हाध्यक्ष नेमण्याचा प्रयोग करूनही पक्षांतर्गत कलह व गटबाजीचे राजकारण संपुष्टात आले नाही. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना शिंदे गट मजबूत होण्याऐवजी आणखी कमकुवत होत असल्याचे चित्र आहे.

पक्षाचे जेष्ठ नेते, माजी जिल्हाप्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्कप्रमुख विजय मालोकार यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार भावना गवळी यांच्या पुढाकारातून विजय मालोकार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. अकोल्यातील शिंदे गटाच्या नेत्यांना ते देखील रुचले नव्हते. विजय मालोकार शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यावर सुमारे वर्षभरापासून त्यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्या पदासाठी त्यांच्या नावाचा विचार न करता पक्षात नव्याने दाखल होणाऱ्यांना संधी देण्यात आली. पक्षांतर्गत गटबाजी व वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे विजय मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. आता त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे.

विजय मालोकार अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या सुरुवातीपासून कार्यरत होते. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे (एसटी) संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. १९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. त्यानंतरच्या तीन निवडणुका लढवल्या. २००४ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी ४० हजारावर मते घेतली. २००९ मध्ये जनसुराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून व २०१४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काही काळ मनसे जिल्हाप्रमुख आणि भाजपमध्ये असतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. आता ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.