बुलढाणा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संमिश्र यश मिळालेल्या शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अग्निपरीक्षा ठरणार आहे.लोकसभेत पक्षाला स्वतःची चूक भोवली तर विधानसभेत नशिबाचा कौल मिळाला नाही. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या माध्यमाने ठाकरे गटाला आपली ताकद नव्याने आजमावण्याची मोठी संधी मिळाली आहे. आगामी ११ नगर परिषद, १३ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाची पक्षाने जोरदार तयारी चालविली आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्यावर आलेल्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सत्ताधारी शिंदे गटाची आमिष, ‘ऑफर’ नाकारून सेनेतच राहण्याचे धाडस बहुसंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दाखविले. या निष्ठावान सैनिकांना या निवडणुकात न्याय मिळतो का, नेते त्यात यशस्वी होतात का याचा फैसला लवकरच होणार आहे.
महाविकास आघाडी प्रमाणेच ठाकरे गटाने स्थानिक निवडणुची मागील अनेक महिन्यापासून तयारी चालविली आहे. मित्र पक्षांसोबत किमान दोन जिल्हा स्तर बैठका झाल्या. स्वतंत्र बैठकीचा धडाका सुरूच आहे. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व बुलढान्यातील बाजार समिती, जन शिक्षण संस्थान याभोवती या हालचाली केंद्रित झाल्या आहे.जिल्ह्याच्या राजकारणात अजातशत्रू आणि ठाकरे गटातील सर्वमान्य नेतृत्व अशी बुधवत यांची ओळख आहे. यामुळे सेनेच्या उभ्या फुटीत ठाकरे गटाची जास्त पडझड न होण्यात त्यांचा प्रमुख वाटा राहिला. मात्र आता या निष्ठावान सैनिकांना स्थानिक मध्ये न्याय मिळवून देण्याचे मजेदार आव्हान देखील त्यांना पेलावे लागणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा या जिल्हास्तरीय बैठकीचा अजेंडा होता. बैठकीत त्यावर खलबते करण्यात आली. जास्तीत जास्त जागा निवडून येण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी आपापले व्हिजन मांडले. त्यानंतर नियोजन करण्यात आले. शहर प्रमुख, तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचा वस्तुनिष्ठ आढावा बैठकीत घेण्यात आला. बुलढाणा बाजार समितीच्या शेतकरी भावनात ही बैठक पार पडली.जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात, सहसंपर्कप्रमुख छगन मेहत्रे, वसंत भोजने , निवडणूक प्रमुख संदीपदादा शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदा बढे, विजया खडसान, गजानन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक मतदार संघातील नगरपरिषद, जिल्हा परिषद गट,व पंचायत समिती गण चा आढावा घेण्यात आला.
नेत्यांची सूचक विधाने
आमदार सिद्धार्थ खरात यांनी केवळ मेहकर व लोणार तालुकाच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जिल्ह्यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले. नरेंद्र खेडेकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असले तरी संपूर्ण जिल्हाभरात शिवसेनेची ताकद या निवडणुकीतून दिसून येईल, असे सूचक विधान केले.जालिंदर बुधवत म्हणाले की,महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक गट, गण या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पातळीवर समीकरण यांचा अहवाल पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या माध्यमातून भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.