बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात धोधो पावसाने हजेरी लावली, एवढेच काय सप्टेंबर मध्यावरच पावसाने शतक गाठले. मात्र आमदार, पालकमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचेच असताना देखील आणि खरीप हंगाम निकषावर बोट ठेवून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर एका युवा शेतकऱ्याने लोकप्रतिनिधी व महायुती सरकारचा अभिनव पद्धतीने निषेध केला आहे. आजवरचा संततधार पाऊस आणि काल झालेली अतिवृष्टी यामुळे त्याच्या शेतात कंबर इतके पाणी साचले आहे. शेतात साचलेल्या पाण्यात त्याने चक्क पोहत आपला निषेध व्यक्त केला आहे. शेतात पोहण्यासारखे पाणी असल्याने आरामात पोहत त्याने निषेध व्यक्त केला.
पळसखेड चक्का, उमरदसह विविध गावात शेतकऱ्यांच्या शेतात कंबरेएवढे पाणी साचले आहे. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने पिकांची मुळे सडली आहेत. आजच्या ढगफुटीसदृश पावसाने त्यात मोठी भर पडली. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शासनाने सिंदखेड राजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. परंतु त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पळसखेड चक्का येथील बालाजी सोसे या शेतकऱ्याने चक्क शेतात तुंबलेल्या पाण्यात पोहून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
‘आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा’ अशी मागणी करीत सोशल मीडियावर शेतकऱ्याने पिकांतील पाण्यात पोहण्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. नेतेमंडळी आणि मायबाप राज्य सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखी किती पाऊस, किती नुकसान पाहिजे? असा सवाल त्याने केला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर वेगाने सार्वत्रिक होत आहे.
११ मंडळात अतिवृष्टी
दरम्यान आज मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या गत २४ तासात जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे. तसेच तब्बल ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलढाणा, संग्रामपूरआणि जळगाव जामोद तालुक्यात कमी पाऊस झाला. मात्र मलकापूर ( १०२. ३मिमी), देऊळगाव राजा ( ६६. ३मिमी), सिंदखेड राजा ( ६१मिमी), नांदुरा (४१), मोताळा (३३), चिखली (३६ मिमी), लोणार ( २९), शेगाव ( २४) मिमी पावसाची नोंद झाली. तब्बल ११ महसूल मंडळात अतिवृष्टी म्हणजे ६५ मिलिमिटर पेक्षा जास्त पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये सिंदखेड राजातील सिंदखेड राजा, दुसरबीड आणि किनगाव राजा, चिखली मधील पेठ, मलकापूर तालुक्यातील मलकापूर, जांभूळ धाबा, नरवेल आणि धरणगाव देऊळगा राजा तालुक्यातील तुळजापूर, अंढेरा आणि मोताळा तालुक्यातील शेलापूर महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
बुलढाणा : शासनाने सिंदखेड राजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. परंतु त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पळसखेड चक्का येथील बालाजी सोसे या शेतकऱ्याने चक्क शेतात तुंबलेल्या पाण्यात पोहून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.https://t.co/2jrmCKvB4K… pic.twitter.com/7ee4fisLG7
— LoksattaLive (@LoksattaLive) September 16, 2025
जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात
काल सोमवारी ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सिंदखेड राजा, किनगाव राजा आणि दुसरबीड या तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची अर्थात ६५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील वार्षिक पर्जन्यमानाने सप्टेंबर मध्यावरच शतक गाठले! वार्षिक सरासरी ८०१. ९ मिमी असलेल्या सिंदखेड राजा मध्ये आज १६ सप्टेंबर अखेर ८२१ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे पावसाने घातलेले थैमान स्पष्ट होते.