नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीजचोरी कमी होईल, असा दावा महावितरण व शासनाकडून केला जात होता. परंतु, आता या मीटरमध्येही राज्याभरात वीजचोरीची ७४३ प्रकरणे समोर आली आहे. ही चोरी नेमकी कशी केली जाते आणि कोणत्या भागात किती या पद्धतीच्या वीजचोरी पकडल्या गेल्या, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

‘स्मार्ट मीटर’ला विविध ग्राहक संघटना, नागरिक, वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना, राजकीय पक्षांकडून आजही विरोध सुरूच आहे. ‘मीटर पोस्ट पेड’च राहणार असून यात ‘प्रिपेड’ची सोय राहणार नाही, असे महावितरणने म्हटले होते. सोबतच या मीटरमुळे वीजचोरी व वीज हानी कमी होणार असल्याचा दावाही महावितरणने केला होता. परंतु प्रत्यक्षात या मीटरमधूनही वीजचोरी होत असून सर्वाधिक प्रकार मराठवाडा परिसरात आढळून येत आहेत. राज्याच्या इतरही भागात कमी-अधिक प्रमाणात वीजचोरीची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महावितरणसह राज्य शासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘स्मार्ट मीटर’मधून चोरी होत असल्याची कबुली महावितरणच्या मुंबईतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली.

नवीन मीटरमधून चोरी कशी होते?

मीटरमध्ये लहान छिद्र करून छेडछाड केली जाते, चुंबक लावूनही वीजचोरी होते, काही जण महावितरणच्या मूळ वीज सर्व्हिस वाहिनीतून बायपास पद्धतीने वीजचोरी करताना आढळले आहेत. हा प्रकार बघून महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे म्हणने काय ?

महावितरणच्या भरारी पथकांना स्मार्ट मीटर (टीओडी मीटर)मध्ये वीजचोरी झाल्याचे आढळत आहे. या प्रकरणांचा योग्य अभ्यास करण्याची सूचना संबधितांना केली आहे. अशा वीजग्राहकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना महावितरणच्या दक्षता व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिती यांनी दिली.

स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत आजही आंदोलन सुरू

स्मार्ट प्रीपेड मीटरला आजही विविध ग्राहक संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटनांचा विरोध आहे. या मीटरविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिकाही टाकली गेली आहे. तर दुसरीकडे स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधी कृती समितीकडून नागपूरसह राज्यातील इतरही भागात आंदोलन केले जात आहे. त्यानंतरही महावितरणकडून या मीटरची आताही सक्ती केली जात असल्याचे चित्र आहे.

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयनिहाय वीजचोरी

प्रादेशिक कार्यालय वीजचोरीची प्रकरणे
नागपूर १४१
छत्रपती संभाजीनगर ३४३
कोकण १६७
पुणे ९२