लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : हृदयाच्या विविध आजारावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. पैसा नसल्यास अनेक वेळा हृदय रुग्णांवर उपचार होत नाहीत. उपचाराअभावी हृदयरुग्णांचा जीव जाऊ नये म्हणून तब्बल २९ वर्षांपासून अकोल्यात नि:शुल्क हृदय शस्त्रक्रिया उपक्रम घेतला जातो. यातून आतापर्यंत दोन हजार १९७ रुग्णांवर अवघड हृदय शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना नवसंजीवनी मिळाली.

हृदय हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. ते मुठीच्या आकाराचे एक शक्तिशाली स्नायू आहे. जे रक्तवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे संपूर्ण शरीरात रक्त पंप करते. हृदय आणि रक्तवाहिन्या एकत्रितपणे शरीराची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली बनवतात. अनेक वेळा जन्मजात हृदयरोग राहू शकतो किंवा वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हृदयरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जरी शासकीय योजनेतून हृदयशस्त्रक्रिया करता येत असल्या तरी काही वर्षांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया अत्यंत अवघड व महागडी उपचार प्रक्रिया होती. त्यामुळे २९ वर्षांपूर्वी अकोल्यात सुभाष चांडक यांनी नि:शुल्क हृदयशस्त्रक्रिया उपक्रमाला सुरुवात केली.

लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लॉयन्स क्लब अकोला कॉटन सिटी, मुंबईतील जे जे रुग्णालय, सिटी रुग्णालय, लोटस सुपर स्पेशालिटी रुग्णालय, स्पंदन रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने स्व. कैलासचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतिनिमित्त हृदयशस्त्रक्रिया उपक्रम सलग २९ वर्षांपासून राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल दोन हजार १९७ रुग्णांवर हृदयशस्त्रक्रिया केल्याने त्यांना नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे या अत्यंत अवघड व किचकट हृदयशस्त्रक्रिया उपचारामध्ये आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नाही. अत्यंत लहान वयातील बालकापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील गरजू रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सुभाष चांडक यांनी दिली.

यावर्षी रुग्णांची तपासणी करून १८ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश संतानी, तर उद्घाटक खासदार अनुप धोत्रे, प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह उपस्थित होते. अश्विनकुमार बाजोरिया, डॉ. अशोक बावस्कर, रमाकांत खेतान, संतोष डिडवानी, किशोर गरड, संदीप अग्रवाल, डॉ. के. एन. भोसले, डॉ. अंबरीश खटोड, डॉ. विशाल काळे, डॉ. दीपक केळकर, वैशाली बाजोरीया, माधुरी भोसले, शामलता सोनालावाला आदी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या काही रुग्णांवर शहरातील सिटी रुग्णालय व लोटस रुग्णालयात, तर अवघड शस्त्रक्रिया मुंबई व इतर ठिकाणी केल्या जाणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special initiative in akola 2197 free surgeries in 29 years ppd 88 mrj