“दिल्लीतील बापाच्या नावाने मतं मागवून दाखवा”; संजय राऊतांच्या आव्हानावर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार (नेते, भाजपा)

नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आता दिल्लीतील बापाच्या नावाने मतं मागवून दाखवा, असं आव्हान दिलं. यावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुणी कुणाच्या बापाच्या नावाने मतं मागितली हे सर्वांना माहिती आहे,” असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला लगावला. ते नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कुणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये कोणाच्या नावाने मतं मागितली हे सर्वांना माहिती आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. रोज खालच्या पातळीवर बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेला जात आहे.”

“तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपाला देण्याची गरज नाही,” असा जोरदार हल्ला मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर चढवला.

हेही वाचा : “एकनाथ खडसेंना ६ मतं भाजपातून मिळणार”; राष्ट्रवादीच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंनी ४० वर्षे…”

बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आलीय. यावर विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “यापूर्वी कंगना राणावतलाही केंद्राने सुरक्षा दिली होती. त्यामुळे या बंडखोर आमदारांना जीवाला धोका असेल आणि तशा पद्धतीची माहिती आयबीकडून सरकारला मिळाली असेल, तर सुरक्षा पुरवणं ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे.”

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantiwar critize sanjay raut shivsena over rebel pbs

Next Story
नागपूर : जावयाकडून सासू-सासऱ्यांची हत्या ; पत्नी व सावत्र मुलीवरही हल्ला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी