नागपूर : न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना रविवारीही १०२ डिग्री ताप आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर एन्जिओग्राफी करता येईल का, याबाबतची शक्यता उद्या तपासली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केदार यांच्या क्ष-किरण तपासणीत रविवारी न्युमोनियाची प्राथमिक लक्षणे आढळली होती. सोबत त्यांच्या श्वसनमार्गातही संक्रमण, १०२ डिग्री ताप व त्यांचे क्रिएटिनिन वाढल्याचेही पुढे आले होते. एन्जिओग्राफी करताना द्याव्या लागणाऱ्या ‘डाय’मुळे मूत्रपिंडाला धोका संभावतो. त्यामुळे पुन्हा क्रिएटिनिन तपासणी होणार आहे. त्याच्या अहवालानंतर मेडिकलचे तज्ज्ञ डॉक्टर एन्जिओग्राफीबाबत निर्णय घेतील. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, अशा रुग्णांना प्रतिजैविक औषधांची मात्रा किमान पाच दिवस द्यावी लागते. केदार शुक्रवारी रात्री उशिरा दाखल झाले. त्यामुळे त्यांना आणखी दोन दिवस औषधे घ्यावी लागतील. त्यानंतरच पुढचा निर्णय होईल. दरम्यान शुक्रवारी रात्री केदार यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले गेले. रविवारी आणि सोमवारीही त्यांच्या बऱ्याच चाचण्या झाल्या. सध्या त्यांना खोकला असून मायग्रेनच्या त्रासामुळे गरजेनुसार प्राणवायू (ऑक्सिजन) दिले जात आहे.

हेही वाचा >>>पारवे, कडूंना एक, तर केदारांना दुसरा न्याय का? आमदार अपात्रतेप्रकरणी काँग्रेसचा सवाल

ललित पाटीलसारखाच वाचवण्याचा प्रयत्न- आशीष देशमुख

सुनील केदार यांना न्यायालयाने शिक्षा सुनावताच ते रुग्णालयात दाखल होणे संशयास्पद आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात ललित पाटीलला तिथल्या अधिष्ठातांनी कारण नसताना दाखल केल्यासारखाच हाही प्रकार आहे. शिक्षा सुनावल्यानंतर केदारांचे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आरोग्य चांगले होते. न्यायालयातून निघताना त्यांनी कार्यकर्त्यांचा जल्लोषही स्वीकारला. परंतु काही मिनिटांनी त्यांची तब्येत बिघडली आणि आता ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण खात्याने चौकशी करावी. एवढेच नाही तर ज्या प्रकरणात शेतकऱ्यांना २२ वर्षानंतर न्याय मिळाला त्या प्रकरणात शिक्षा झालेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून तुरुंगवासापासून लांब नेणे योग्य नाही, असे मत भाजप नेते आशीष देशमुख यांनी व्यक्त केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil kedar has fever along with respiratory tract infection nagpur mnb 82 amy