नागपूर : माजी मंत्री व काँग्रेस नेते सुनील केदार यांनी या नागपूर जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगला दम दिला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपचे लोक माजले आहे. त्यांना जनतेच्या दारात उभे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तसेच प्रशासकीय अधिकारी जे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे त्यांना मुजरे करायला लावणार आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला. ते कामठी येथे ‘वोट चोर गद्दी छोड’ या काँग्रेसतर्फे आयोजित निषेध मेळाव्यात बुधवारी बोलत होते.

त्यांनी यावेळी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस एक हाती विजय मिळवणार आहे असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणावरही टीका केली आहे. ते म्हणाले २०२४ ची लोकसभा निवडणूक ते संविधान बदलण्यासाठी लढले त्यासाठीच त्यांना ४०० हून अधिक खासदार हवे होते. परंतु लोकांना वेळीच लक्षात आल्याने त्यांना ४०० खासदार निवडून आणता आले नाही. तसेच २०१९ ची लोकसभा निवडणूक सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात होती परंतु त्यांनी एन वेळी पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला. त्यामुळे लोकांमध्ये भावनात्मक संदेश गेला आणि त्यांनी अशा प्रकारे ती निवडणूक जिंकली, असा दावाही सुनील केदार यांनी केला.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपा व रा. स्व. संघावर तोफ डागली, ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत प्रत्येक दाम्प्त्याने ३ मुलांना जन्म द्यावा असे सांगतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका घरी ५६ मुले दाखवण्यात आली आहेत आणि १० बाय १० च्या खोलीत १०९ मतदार दाखवले आहेत. भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे भित्रे लोक आहेत, वोट चोरी करून सत्तेत आले आहेत. भाजपाचे लोक एकमेकाला चिमटे घेऊन विचारत होते आपण विजयी झालो का.. कामठीचा सरदार तर यात सर्वात पुढे होता. मतांचा बाजार कामठीतून सुरू झाला हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. भाजपाची सत्ता असल्याने मतचोरांना शिक्षा होणार नाही पण मतदार मात्र या मतचोरांना शिक्षा देणार आहे. महाराष्ट्रातील या मतदारचोरांना धडा शिकवला पाहिजे, जिल्हा परिषद निवडणुकीत मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची औकात दाखवा, असे वड्डेवार म्हणाले.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, यशोमती ठाकूर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपा व निवडणूक आयोगावर तोफ डागत लोकशाही व संविधानावर होत असलेला हल्ला हाणून पाडला पाहिजे असे म्हटले.