नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फुटाळा तलावातील फाउंटेन आणि बांधकाम प्रकल्पाच्या कामांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर आता कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “लागा कामाला” असा आदेश दिला.

या बैठकीला माजी आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, फाउंटेन प्रकल्पाच्या कलादिग्दर्शक अभिनेत्री रेवती तसेच महामेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी उपस्थित होते.गडकरी यांनी बैठकीत आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा सखोल आढावा घेत, फाउंटेनचे काम तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. “काम पुन्हा सुरू करताना नव्याने येणाऱ्या खर्चाचा अचूक अंदाज घ्या आणि जर काही दुरुस्ती आवश्यक असेल तर ती तत्काळ पूर्ण करा,” असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, आधी बसवलेल्या पण आता खराब झालेल्या केबल्सचा इतर प्रकल्पांमध्ये पुनर्वापर करता येईल का, हेही तपासण्यास सांगितले.

प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले. त्यांनी सांगितले की, फुटाळा तलाव परिसरातील फाउंटेन प्रकल्प नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल आणि त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकल्पासंदर्भातील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना आता कामांना नव्याने गती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गडकरी यांच्या पुढाकारामुळे फुटाळा तलाव परिसरातील विकासकामांना पुन्हा एकदा वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूरमधील फुटाळा तलाव हा शहरातील एक अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. तलावाच्या परिसरात उभारलेला संगीतमय फाऊंटेन हा येथील मुख्य आकर्षण आहे. पण, तेथे सध्या बंद आहे. सायंकाळी सुरू होणारा हा फाऊंटेन रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या पाण्याच्या धारा पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात. तलावाभोवती सुंदर बाग, पायी चालण्यासाठी मार्ग, सुविधा आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे येथे नेहमीच गर्दी असते. नागपूरच्या स्वच्छ आणि सांस्कृतिक सौंदर्याचे प्रतीक मानला जाणारा फुटाळा तलाव फाऊंटेन हे कुटुंब, मित्र आणि पर्यटकांसाठी आनंददायी ठिकाण आहे.