नागपूर : राज्यातील वाघांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांना अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्षही उद्भवत आहे. हे घडू नये आणि वाघांना क्षेत्र कमी पडू नये, यासाठी त्यांच्या स्थानांतराच्या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्रातून झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्रदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुनगंटीवार यांनी राज्याच्या व्याघ्रसंवर्धनावर आणि वाघांशी संबंधित विषयांवर भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले, ‘‘वाढलेली वाघांची संख्या आणि कमी पडणारा अधिवास ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाकडून ज्या जंगलक्षेत्रात वाघांची संख्या कमी तिथे त्यांच्या स्थलांतरणाचा प्रयोग करण्यात येत आहे. महाराष्ट्रातला पहिला यशस्वी प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यात झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून दोन वाघिणी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आल्या. पुढे यातील एका वाघिणीने नैसर्गिक स्थलांतर केले तर एक त्या ठिकाणीच स्थिरावली. हा प्रयोग राज्यात इतरत्रही राबवता येतो का, याची चाचपणी आम्ही करीत आहोत.’’

वाघांच्या स्थलांतरासाठी नागझिऱ्याला पसंती असली तरीही सह्याद्री पर्वतराजी आणि पश्चिम घाट परिसरातही स्थानांतर करण्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल. त्या ठिकाणी वाघांचे अन्न असलेले तृणभक्षी, प्राणी आहेत का, ते त्या ठिकाणी कसे वाढतील हे बघून मग त्या ठिकाणी इतर ठिकाणाहून वाघ सोडता येतील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

व्याघ्र संरक्षण दलाला नियमित वेतन

राज्य व्याघ्र संरक्षण दल राज्यात ठिकठिकाणी वाघांच्या संरक्षणासाठी तैनात आहे. परंतु, या दलातील कर्माचाऱ्यांना वेतनाच्या समस्येचा तोंड द्यावे लागत आहे. वेतनासाठी केंद्राकडून काही निधी येतो. मात्र, आता केंद्राकडून निधी येवो न येवो राज्य सरकार नियमितपणे वेतन देणार आहे. कर्मचाऱ्यांना वेतनासाठी ताटकळावे लागणार नाही.

जेरबंद प्राण्यांसाठी धोरण आवश्यक

जेरबंद प्राण्यांसाठी धोरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज २० पेक्षा अधिक वाघ आणि ६५ पेक्षा अधिक बिबटे पिंजऱ्यात आहेत. देशातील प्राणिसंग्रहालयांना ते देता येतील का याचा विचार सुरू आहे. धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी आता २४ तासांत परवानगी देण्याचे अधिकार प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे असतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

‘वनमित्र’, ‘व्याघ्रमित्र’ संकल्पना

गावातील लोकांना जंगल आणि व्याघ्रसंरक्षणात सामावून घेण्यासाठी ‘वनमित्र’, ‘व्याघ्रमित्र’ ही संकल्पना रुजवण्यात येत आहे. त्यातून वाघ हा आपला शत्रू नाही तर मित्र आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

भरपाई ३० दिवसांत न मिळाल्यास व्याज

वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्याची भरपाई ३० दिवसांत न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल केले जाईल. याबाबतचे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजूर झाले आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

भाडय़ाच्या जमिनीवर कुरण

जंगलक्षेत्राला लागून असलेल्या शेतीमध्ये वन्यप्राणी शिरल्याने पिकांचे नुकसान होते. त्यासाठी आतापर्यंत सौर कुंपण घातले जात होते. पण त्यापेक्षाही तारांचे सामूहिक कुंपण कसे घालता येईल, यावर विचार करण्यात येत आहे. जंगलक्षेत्रात चराईसाठी गावकरी गुरे घेऊन जातात. पण, आता दुभत्या जनावरांसाठी वनखात्याने प्रत्येक गावात जमीन भाडय़ाने घेऊन त्यावर कुरण विकसित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याकरिता निधी कमी पडणार नाही. तसेच वाघांच्या परिभ्रमण मार्गासाठी (टायगर कॉरिडॉर) नवीन वनीकरण केलेली जमीन घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांसाठी वसाहत

जंगलाचे रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता चांगली वसाहत बांधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे ते दुसरीकडे जाऊन राहतात. त्याचा परिणाम वने, वन्यजीव संरक्षणावरही होतो. त्यामुळेच आता त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधायुक्त वसाहत बांधण्यात येणार आहे.

जखमी वन्यप्राण्यांसाठी बचाव वाहने

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या भरपाईत वाढ करण्याचा विचार आहे. उपचारासाठी सरकारी रुग्णालयाची अट शिथिल करण्यात येत आहे. जखमीला खासगी रुग्णालय उपचार करायचे असतील तर त्याला पाच लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाईल. मानव-वन्यजीव संघर्षांत माणूसच नाही तर वन्यप्राणीही जखमी होतात. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बचाव वाहने खरेदी करण्यात येत असून त्यासाठी दोन कंपन्यांचे प्रस्ताव देण्यात येणार आहेत, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

वाघांच्या संख्येत वाढ

राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. २०१४ला मी वनमंत्री असताना राज्यात १९० वाघ होते. २०२३ मध्ये ही संख्या ३५२ झाली आहे. दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे वाघ गृहीत धरले तर ती त्यापेक्षाही अधिक म्हणजे सुमारे ५०० इतकी असेल. वनखात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्याघ्रसंवर्धनासाठी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे, असेही वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.लोकसत्ता आणि वनविभागाच्यावतीने वाघ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कॉफी टेबल बुक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.