नागपूर: नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर असून येथून येथील रेल्वे स्थानकांवरून देशाच्या चारही बाजूंना जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. ब्रिटीशकालीन असलेले हे रेल्वे स्थानक अनेक घटनांचे साक्षीदार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही अनेक मोठ्या नेत्यांनी येथून प्रवास केला आहे. त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सुद्धा समावेश आहे. राष्ट्रपित्याच्या नागपूर भेटीची माहिती देणारा दगडी फलक रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.

या फलकावर दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे २० डिसेंबर १९२० मध्ये नागपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला राष्ट्रपिता महात्मा गांधी नागपुरात आले होते. याच अधिवेशनात गाधींजींनी अहिंसा व असहयोग आंदोलनाचा नारा दिला होता तसेच  गांधीजींनी तयार केलेले संविधान स्वीकारण्यात आले होते. याच अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची घोषणा काँग्रेसने केलो होती. एप्रिल १९२५ मध्ये नागपूरमध्येच झालेल्या अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गांधी होते. १९२७ मध्ये त्यांनी खामगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाला भेट देऊन  शिक्षकांना चरखा वापरण्याचे आवाहन केले होते.