महेश बोकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानच्या मार्गावर ‘एसटी’ची पहिली फेरी १५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली होती. त्यानंतर नागपूर-औरंगाबाद सेवा सुरू झाली. परंतु खासगी ट्रॅव्हल्सहून एसटीचे नागपूरहून शिर्डी आणि औरंगाबाद दरम्यानचे भाडे जास्त असल्याने या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे एसटीला समृद्धीवरील सर्व फेऱ्या स्थगित कराव्या लागल्या.

राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी दरम्यानचे उद्घाटन पंतप्रधानांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी केले होते. चार दिवसांनी १५ डिसेंबरपासून या महामार्गावरून एसटीची नागपूर-शिर्डी-नागपूर दरम्यान पहिली बस सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना विनाथांबा तीव्र गतीने निश्चित ठिकाणी जाता येत होते. दरम्यान, एसटीची नागपूर-औरंगाबाद-नागपूर सेवाही सुरू झाली. या महामार्गावर नागपूर-शिर्डी दरम्यान ५४९ किलोमीटरसाठी एसटीने १,३०० रुपये भाडे निश्चित केले होते.

नागपूर-शिर्डी फेरी सुरू झाल्यावर डिसेंबर २०२२ दरम्यान प्रत्येक एसटी बसमध्ये प्रवासी भारमान ४० ते ४१ टक्के होते. नागपूर-औरंगाबाद दरम्यानही प्रवासी भारमानाची जवळपास हीच स्थिती होती. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे नागपूर-शिर्डी दरम्यान इतर महामार्गावरील भाडे शयनयान वातानुकूलित बसेससाठी ८०० रुपये ते १,२०० रुपयांच्या दरम्यान होते. त्यामुळे एसटीहून अद्ययावत असलेल्या खासगी बसचा आरामदायी प्रवास जास्त स्वस्त असल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जानेवारी २०२३ पासून हळूहळू समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या एसटीचे प्रवासी भारमान आणखी घसरले. फेब्रुवारीत हे भारमान ८ ते ९ टक्यांवर आले. त्यामुळे एसटीला डिझेल व पथकराचेही पैसे निघणे अवघड झाल्याने या मार्गावरील फेऱ्या स्थगित कराव्या लागल्या.

प्रवासी नसणे यासह इतर कारणांमुळे तूर्तास या महामार्गावरील एसटीच्या फेऱ्या स्थगित करण्यात आल्या आहे. त्या पूर्णपणे बंद केल्या नाहीत. त्यामुळे लवकरच या महामार्गावर फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील.

– श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्रमांक ३, एसटी महामंडळ.

घटती प्रवासीसंख्या..

एसटीच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी बसमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४१ टक्के प्रवासी भारमान होते. जानेवारी २०२३ मध्ये प्रवासी भारमान १३ टक्के आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये केवळ ८ टक्क्यांवर आले. तर या काळात काही दिवस एकही प्रवासी नसल्याने बसच सोडता आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wheels of st stopped within three months on the samriddhi highway ysh