यवतमाळ : एटीएम मशीन बाहेर असलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यावर चोरट्यांनी काळा स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम मशीन फोडून सुमारे २१ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शहरातील दाते कॉलेज चौकात शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील सराईत टोळीने हे कृत्य केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दाते कॉलेज चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन आहे. या एटीएम मशीनची देखरेख आणि मेन्टनस विवेक भालेराव या कर्मचाऱ्याकडे असून, तो महिन्यातून एकदा भेट देत होता. तीन दिवसापूर्वीच २७ फेब्रुवारीला या एटीएममध्ये कॅश टाकण्यात आली होती. अशातच शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी या एटीएम बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहायाने एटीएम मशीन फोडून जवळपास २१ लाखांची रोख लंपास केली.

हेही वाचा…आमदार संजय गायकवाड म्हणतात, “मिरवणुकीत युवकास मारहाणीचा पश्चाताप नाही, ती तर भूषणावह बाब!”

ही बाब दुपारी परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर याबाबतची माहिती मिळताच देखरेख करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी विवेक भालेराव याने त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. याबाबतची माहिती अवधुतवाडी पोलिसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण भाकडे, धैर्यशील घाडगे, एलसीबीतील विवेक देखमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. या चोरीमागे परप्रांतीय टोळी असल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thieves use gas cutter to break atm loot 21 lakhs in yavatmal nrp 78 psg