Tiger Death Ballarshah Gondia Railway Line नागपूर : बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर ब्रम्हपुरी वनक्षेत्रात सिंदेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला आहे. या मार्गावर आतापर्यंत १८ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. भारतातील वन्यप्राण्यांसाठी हा सर्वाधिक धोकादायक मार्ग ठरला आहे. आजतागायत कोणत्याही रेल्वे मार्गावर इतके वन्यप्राणी मारले गेलेले नाही.हा रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरला आहे. आज पहाटेच्या सुमारास वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर सातत्याने वन्यप्राण्यांचे बळी जात आहेत. मात्र, रेल्वे विभागाने अजूनही या मार्गावर मेटीगेशन मेजर्स घेतले नाही. वनविभाग खर्च देणार असेल तरच यावर विचार होईल अशी भूमिका त्यांनी घेतली. याउलट वन्यप्राण्यांचे मार्ग अडवण्याचा प्रकार त्यांनी सुरू केला आहे. हा ताडोबा-कन्हाळगाव ते पुढे असा कॉरिडॉर आहे, मात्र रेल्वेने याठिकाणी फेन्सिंग करण्यास सुरुवात केली आहे.

जवळजवळ आत किलोमीटर चे फेन्सिंग याठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा कॉरिडॉर खंडित करण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे. हा रेल्वेमार्ग गोंदिया, जबलपूर आणि पुढे बालाघाट असा जातो. कान्हा-पेंच कॉरिडॉर मधून हा मार्ग जात असल्याने मध्यप्रदेशात त्याठिकाणी मॅटिगेशन मेजर्स घेण्यात आल्याने त्याठिकाणी वन्यप्राणी मृत्यूच्या घटना नाही. महाराष्ट्रात मात्र मेटीगेशन मेजर्स अभावी १८ वाघांचा बळी गेला आहे. केंद्राच्या रेल्वे आणि पर्यावरण विभागाने मार्च २०२५ मध्ये एक अहवाल तयार केला होता, तो देखील धूळखात पडला आहे. तर रेल्वे मार्गावरील उपाययोजनासंदर्भात काही वन्यजीप्रेमींनी नागपूर उच्चन्यायालायत याचिका देखील दाखल केली आहे.

रेल्वेचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष

बल्लारशाह गोंदिया लाईन ही देशातील वाघांची सर्वात मोठी हत्या करणारी लाईन आहे. या लाईनवर १८ वाघांव्यतिरिक्त, २७ रानगवे, असंख्य लांडगे, तरस, अस्वल मारले गेले आहेत. भारतीय रेल्वे वन्यजीवांचे मृत्यू रोखण्यासाठी बेकायदेशीरपणे लाईनवर कुंपण घालत आहे, तर अंडरपास, नॉइज बॅरियर्स, लाईट बॅरियर्स, रबराइज्ड मॅट्स, इलेक्ट्रोमॅट्स आणि घुसखोरी शोध प्रणाली यासारख्या इतर उपायांकडे दुर्लक्ष करत आहे. प्रोजेक्ट एलिफंट, एमओईएफसीसी आणि रेल्वे मंत्रालयाच्या या शिफारसी तातडीने अंमलात आणल्या पाहिजेत, असे रोडकिल्स इंडियाच्या शीतल कोल्हे यांनी सांगितले. त्यांनी रेल्वे लाईनवर प्राण्यांच्या मृत्यूचा डेटा गोळा केला आहे.

मृत पावलेला वाघ “बिट्टू”

उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यातील प्रसिद्ध वाघ “जय” याचा मुलगा आहे. “श्रीनिवास” या दुसऱ्या मुलाचा वाघाचा काही वर्षांपूर्वी विजप्रवाहाने मृत्यू झाला होता. दरम्यान, या मृत्यूने वनखातेही हादरले आहे.