नागपूर : राज्यातील मानव-वाघ संघर्ष आता चंद्रपूर जिल्ह्यातच राहिला नसून इतर जिल्ह्यातही मानव-वाघ संघर्ष सुरू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात शनिवारी रात्री चक्क ११.३० वाजताच्या सुमारास वाघाने ठाण मांडले आणि गोंदियातील नागरिकांची झोप उडवली. पहाटे ४.३० वाजता या वाघाला रेस्क्यू करून नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात त्याची रवानगी करण्यात आली.

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या आता हळूहळू वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक “हेल्दी” वाघ याच जिल्ह्यात पाहायला मिळतात. मात्र, दरम्यानच्या काळात या व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या कमी होत गेली. वाघ येथे स्थिरावरच नसल्याने वन्यजीव प्रेमी देखील चिंतेत होते. मात्र, आता पुन्हा याठिकाणी वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, वाघ आता संरक्षित क्षेत्राबाहेर पडत असल्याने पुन्हा एक नव्याने चिंतेत भर घातली आहे. शनिवारची रात्र गोंदियातील नागरिकांसाठी जागवणारी ठरली. वाघाने चक्क शहरात प्रवेश केला आणि एकच पळापळ झाली. शहरातील सारस चौकात जिल्हाधिकारी कार्यालय आहे. तसेच पोलीस आयुक्त कार्यालय देखील आहे.

रात्री ११.३० वाजताच्या सुमारास याठिकाणी वाघ दिसला आणि एकच पळापळ झाली. वनखात्याला माहिती देण्यात आली आणि खात्याची आरआरटीची चमू याठिकाणी पोहचली. तोपर्यंत जवळजवळ दीड ते दोन हजार लोक याठिकाणी जमले होते. पोलीस खात्याची चमू या गर्दीला आवरत होती आणि दुसरीकडे या वाघाला पकडण्यासाठी वनखात्याने प्रयत्न सुरू केले. एकही चूक झाली असती तर नागरिकांच्या जीवाला धोका होता कारण पहिल्यांदा वाघ शहरात निवासी भागात आला होता. नाईट व्हिजन थर्मल ड्रोन ने वाघाचा ठावठिकाणा शोधला आणि जेसीबी ने वाघापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता तयार केला. याठिकाणी निवासी घरे, कार्यालये असल्याने वनखात्याला हे रेस्क्यू ऑपरेशन्स राबवताना चांगलीच दमछाक झाली. मात्र, पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास या वाघाला बेशुद्ध करण्यात यश आले. तरीही डार्ट लागल्यानंतर तो धावला, पण लगेच औषधांचा परिणाम होऊन तो बेशुद्ध पडला. या वाघाला आता नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात स्थानांतरीत करण्यात आले.

हा वाघ मानवी वस्तीजवळच राहणारा आहे. यापूर्वी देखील जून महिन्यात त्याला जेरबंद करून दूर जंगलात सोडण्यात आले होते, पण तो पुन्हा शहरात आला. गावातील जनावरे खाऊनच तो राहतो, मात्र, आजतागायत त्याने माणसावर हल्ला केला नाही. लगतच्या नदीच्या काठाने तो शहरात आला असावा असे मानद वन्यजीव रक्षक व सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी सांगितले.