गोंदिया : शारदीय नवरात्री उत्सव निमित्ताने छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे बमलेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असलेल्या देवरी तालुक्यातील शिलापूर (भोयरटोला) येथील भाविकांच्या दुचाकीला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.

ही घटना बुधवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास छत्तीसगड राज्यातील ग्राम छुरीया ता. डोंगरगड जि. राजनांदगाव गावाजवळ घडली. संजय मानकर आणि आशिष फुन अशी या अपघातातील मृतांची नावे आहे तर श्यामकुमार भोयर असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही देवरी तालुक्यातील शिलापूर (भोयरटोला) येथून दुचाकी क्रमांक एमएच ३५ ५१७५ ने नवरात्री उत्सव निमित्ताने डोंगरगड बमलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात होते.

दरम्यान, महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमाशुल्क तपासणी नाका परिसरातील छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील छूरीया गावाजवळ त्यांच्या भरधाव दुचाकीची समोरील ट्रकला धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, यात संजय व आशिष या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर श्यामकुमार हा गंभीर जखमी झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी जखमी श्यामकुमारला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून राजनांदगाव येथील रुग्णालयात दाखल केले . घटनेची माहिती मिळताच दोघ्या मृतकांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. या हृदय द्रावक अपघातामुळे देवरी तालुक्यातील शिलापूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

धावत्या रेल्वेगाडीतून पडून मृत्यू

गोंदिया: डोंगरगड येथे आपल्या मित्रमंडळी सोबत बामलेश्वरी देवीचे दर्शन करून नागपूरला परत जात असताना झालेल्या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार ३० सप्टेंबर रोजी घडली. ही घटना आमगाव तालुक्यातील बाम्हणी व पोवारीटोला परिसरात उघडकीस आली. वाहिद खान (४०, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते डोंगरगड येथे आपल्या मित्र मंडळी सोबत देवीचे दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान, जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना ते अचानक गाडीतून खाली पडले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिस तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विषबाधेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ३० सप्टेंबर रोजी शेतात फवारणी करताना शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाला. भागचंद मेकचंद कटरे (५५, रा. धानोली) असे मृताचे नाव आहे.भागचंद हे शेतात विषारी औषध फवारणी करीत होते. या दरम्यान विष त्याच्या नाक-तोंडात गेल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र बुधवार १ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान दुपारी १:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. झामसिंग गोरेलाल कटरे (४३, रा. धानोली) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार दिलीप निमजे करीत आहेत.