नागपूर : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिपोत्सवाचा सण एन तोंडावर येऊ ठेपला आहे. शहरातल्या उत्साहाला एकीकडे उधाण आले आहे. तर दुसरीकडे शहराच्या हद्दीतल घडलेल्या दोन खुनांमुळे उपराजधानी गुरुवारी हादरून गेली. इमामवाडा परिसरातल्या जाट तरोडीत पैशांच्या देवाण घेवाणीतून झालेल्या क्षुल्लक वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एकाचा दगडाने डोके ठेचून खून केला. तर नवीन कामठी पोलीस हद्दीतल जुन्या वैमनस्यातून एकाने पाना- पेचकच चा वार करत खून केला. नेरी गावाजवळच्या विट भट्टीजवळ ही घटना घडली.
निलेश उर्फ बाळा अंबादरे असे इमामवाडा येथे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निलेश हा सराईत बदमाश होता. त्याच्यावर इमामवाडा, अजनी, गणेशपेठ, सिताबर्डी पोलीस ठाण्यात १२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. गणेशपेठ येथे अलिकडेच घडलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा जाटतरोडी भागातील काही जणांशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. याच वादातून बुधवारी रात्री त्याचे दोन अल्पवयीन मुलांशी भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या दोन्ही मुलांनी जवळच पडलेल्या दगडाने त्याचे डोके ठेचत निलेशचा खून केला. रात्री ११ च्या सुमारास जाटतरोडीतल्या वस्तीत ही घटना घडली. इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
जुन्या वैमनस्यातून खून
नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नेरी गावालगतच्या वीट भट्टीजवळ जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादाचे भांडणात रुपांतर होऊन विवेक तांडेकर (२७) याचा देवा वंजारी याने पाना आणि ट्रकचे चाक उघडण्यासाठी लावणाऱ्या अवजाराचे वार करत खून केला. रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडजलेल्या विवेकला पाहून कोणीतरी कामठी पोलिसांना माहिती दिली. रात्री दिडच्या सुमारास घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी विवेकला रुग्णालयात नेले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात देवा वंजारी (४१) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. वेवेक आणि देवा या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गावातल्या वर्चस्वावरून वाद विकोपाला गेला होता. याच वैमनस्यातून देवाने विवेकला संपवले अशी माहिती मिळत आहे.
मंदिराच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर
या घडामोडीत कळमना पोलीसठाणे हद्दीतील सुभान नगरातल्या हनुमान मंदिराच्या बाहेरील भिंतीवर समाजकंटकांनी धार्मिक भावना भडकावणारा आक्षेपार्ह मजकूर रंगाने लिहिल्याने रात्रभर परिसरात तणाव होता. त्याचे पडसाद शहरातल्या अन्य भागांत उमटू नयेत, यासाठी शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना रात्री अलर्ट जारी करण्यात आला होता. मंदिर परिसरातून जाणाऱ्या काही जणांना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा मजकूर दिसल्यानंतर काही जणांनी त्याचे समाजमाध्यमांवर चित्रिकरण व्हायरल केले. त्यामुळे संतप्त जमावाने कळमना पोलिसांना रात्री घेराओ घातला होता. पोलिसांनी तडक घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला.