पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, असे सांगून ४० लाखांची मागणी करणारी ध्वनिफीत नुकतीच प्रसारित झाली होती. याप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपूरमधून आणखी दोघांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २७, रा. वराठी, जि. भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय २७, रा. टेकाडी, बालाघाट, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. यापूर्वी दीपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मूळ रा. नांदगाव, जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली होती. याबाबत एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रविवारी एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, अशी ध्वनिफीत प्रसारित झाली होते.

पुण्यातील एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर याबाबत संपर्क साधण्यात आला होता. तसेच, एमपीएससीकडे देखील अनेक विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two more arrested from nagpur in mpsc question paper case pune print news rbk 25 zws