भाजप हा बाजारबुनग्यांचा पक्ष झाला आहे. इतरांचे पक्ष चोरून महाराष्ट्राला लाचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मी महाराष्टाला लाचार होऊ देणार नाही. तसेच एक देश एक पक्ष हा भाजपाचा डाव साध्य होऊ देणार नाही, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिग्रस येथे केला.
हेही वाचा >>> वाशीम : उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीत जनतेकडे काय मागितले, जाणून घ्या…
आज, रविवारी दुपारी पोहरादेवी (जि. वाशीम) येथे जगदंबा देवीचे आणि संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याचा प्रारंभ केला. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ला असलेल्या दिग्रस येथे सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा नेते अमित शाह यांनी शब्द फिरवल्यानेच युती तुटली. नाही तर ठरल्याप्रमाणे शिवसेना आणि भाजपाचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे असते, असा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. आजकाल खोक्यात खासदार, आमदार विकले जातात. काही आमदार गेले असतील, पण दमदार शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा अभिमान आहे, असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> “फडणवीस मुख्यमंत्री राहतील असे ठरले होते”, मुनगंटीवारांचे वक्तव्य; म्हणाले, “उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत…”
पोहरादेवीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी दिला होता. मात्र आजही येथे जायला व्यवस्थित रस्ता नाही. हा भ्रष्टाचार कोणी केला, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी खासदार भावना गवळी यांचे नाव घेता टीका केली. ‘ईडी’ची नोटीस येताच खासदारताई गायब झाल्या होत्या, असे ते म्हणाले. आमचे महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकांचे होते, तर आता त्यांचे सरकार त्रिशूळ आहे, हे कसे, असा प्रश्न त्यांनी केला. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता. तुम्ही दारोदारी फिरून येथील जनतेचा आशीर्वाद घेऊन दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. माझे नेतृत्व मान्य आहे की नाही, हे लोक ठरवतील. मोदी, शहा यांना तो अधिकार नाही, असे ते म्हणाले. कर्नाटकात बजरंगबली त्यांना पावला नाही. येथेही आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे. जनतेच्या पाठिंब्याने या खोकासुरांना त्यांची जागा दाखवू, असे ठाकरे म्हणाले. जनतेची मते विकणार विकणाऱ्या गद्दारांना गाडा, असे आवाहन यावेळी ठाकरेंनी उपस्थित जनसमुदायाला केले. मेळाव्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.