नागपूर : पंतप्रधान नरेद्र मोदी लोकसभा निवडणूक प्रचारात ज्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करीत आहे ते पंतप्रधान पदाला अशोभनीय असून त्यांच्या वक्तव्यांनी देशाची मान शरमेने खाली जात आहे, असे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, मोदींना पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरच पराभव दिसायला लागला आणि त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील भाषणात मंगळसूत्रचा विषय आणला. तेही चालेले नाही तर म्हैस आणली. दोन म्हशी असतील तर एक म्हैस काँग्रेस काढून येईल, असे भाषणातून सांगू लागले. देशाचे पंतप्रधान एखाद्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सभापतींसारखे बोलत आहेत. यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. आता पुन्हा त्यांची भाषा बदलली आहे. त्यांच्या भाषणात पाकिस्तान, मुसलमान, असे मुद्दे आले. तसेच राम मंदिरही आले. पण जनतेने या जुमलेबाज सरकारला सत्तेबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदींनी कोणताही नवीन जुमला आणला तरी जनतेचा त्याला प्रतिसाद मिळत नाही. मोदींचे भाषण सुरू झाले की लोक टीव्ही बंद करतात. अशी अवस्था मोदींची झाली आहे. भाषणाला लोकांच्या टाळ्या नाहीत, लोकांचा प्रतिसाद नाही म्हणून शेवटच्या टप्प्यात अदानी, अंबानी आणावे लागले. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याला चोख उत्तर दिले आणि मोदींच्या मुद्यातील हवा काढली. मोदी, भाजपाने आता परतीचा मार्ग शोधून ठेवावा एवढीच एक औपचारिकता शिल्लक राहिली आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा – नागपूर : ‘त्या’ ऑटो चालकाविरुद्ध ऑटोरिक्षा चालक संघटना सरसावली

हेही वाचा – ‘भेंडवळची घटमांडणी व भाकीत अवैज्ञानिक, राजकीय भाकीत केल्यास…’

मोदींकडून ठाकरेंच्या आईवडिलांना शिवी

बाळासाहेबांना कोट्यवधी लोक दैवत मानतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नकली नकली म्हणणे ही त्यांच्या आईवडिलांना शिवी आहे, असे मी मानतो. देशाच्या पंतप्रधानांना अशी शिवी देण्याचा अधिकार आहे काय, हे सर्व महाराष्ट्राची आणि देशाची जनता बघत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.