नागपूर : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना, सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते असताना “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी करणारे फडणवीस, आता सत्तेत आल्यावर मात्र ही संकल्पना नियमावलीत नसल्याचे सांगत आहेत, हे हे संताप आणणारे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी स्मरण करून दिले की, १६ ऑक्टोबर २०२० रोजी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे फडणवीस म्हणत होते. आज मात्र राज्यात त्यापेक्षा दहा पट गंभीर स्थिती असूनही, फडणवीस ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पनाच नाकारत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
“तेव्हा ही संकल्पना अस्तित्वात होती आणि आज नाही? हा शुद्ध शब्दांचा खेळ आहे,” अशी टीका करत वडेट्टीवार म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे.” त्यांनी सरकारला आवाहन केले की, केवळ नियम आणि तांत्रिक अडथळ्यांचा आधार घेता कामा नये. शेतकऱ्यांच्या आक्रोशाला प्रतिसाद देत, निकषांपलीकडे जाऊन त्यांना सरसकट आणि भरीव मदत देण्याची सरकारची जबाबदारी आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी “ओला दुष्काळ” जाहीर करून आर्थिक मदत देणे अत्यावश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञही सांगत आहेत.
सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. “राजकारण न करता, संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत,” असेही त्यांनी एक्स वर म्हटले.