चंद्रपूर: विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून राजकारणात नवख्या स्वत:च्या मुलीचे नाव समोर केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटायला सुरूवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षात अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते सक्रीय असतांना स्वत:चीच मुलगी का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसने वडेट्टीवार यांच्यासह आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर अशी तीनच नावे दिल्लीला पाठविली आहेत. त्यामुळे लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. तर शहर अध्यक्ष रितेश तिवारी यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता कुणबी समाजाच्या तरुण नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा सुपारी घेतल्याची टीका समाज माध्यमावर केली आहे.

हेही वाचा…औरंगाबादवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रीजेश दीक्षित यांचे टोचले कान; म्हणाले, “ही चूक…”

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्युनंतर दहा महिन्यांपासून या मतदार संघाला खासदार नाही. काँग्रेस पक्षाची परंपरा बघता व धानोरकर यांच्या पत्नीने दाखविलेली इच्छा बघता आमदार प्रतिभा धानोरकर यांचा या मतदार संघावर पहिला दावा आहे. मात्र मागील आठ दहा दिवसांपासून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वत:ची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले आहे. शिवानी हिने गेल्या तीन ते चार दिवसात लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडी तथा काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या तथा पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले तेव्हापासून काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांच्याप्रती काहीसा नाराजीचा सूर उमटायला सुरूवात झाली आहे.

काँग्रेस पक्षात अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र वडेट्टीवार यांनी तेव्हा धानोरकर यांच्यासाठी दिल्लीत मुक्काम ठोकून चक्रे उलटी फिरवली होती. त्याचा परिणाम बांगडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना मागे घेण्यास भाग पाडून धानोरकर यांना तिकीट दिले गेले. २०२४ मध्ये बांगडे यांचे नाव समोर करण्याऐवजी वडेट्टीवार यांनी मुलीचे नाव समोर केले. त्याचा परिणाम काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये धुसपूस सुरू आहे. नेत्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचेच प्रचार आम्ही करायचे का ? आम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुक लढण्याची संधी मिळणार की नाही, आम्ही ग्राम पंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका याच निवडणुका लढायच्या का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…वर्धा : ‘हर्षवर्धन देशमुख नको, समीर देशमुख द्या’, निवडणूक हालचाली वेगात

विशेष म्हणजे वडेट्टीवार या लोकसभा मतदार संघात अमावस्या-पोर्णिमेला येतात. मुलगी शिवानी तर दोन चार महिन्यांपासून काही ठराविक चेहऱ्यांसोबत ओझरती दिसते. नागपुरात वास्तव्य, ब्रम्हपुरीचे आमदार, विजयक्रांती युनियनचे काम सिमेंट कारखान्यात तेव्हा पिता-पुत्रिचा चंद्रपूर लोकसभेशी संबंध काय अशीही विचारणा काँग्रेस निष्ठावंत करित आहेत. दरम्यान शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर आल्यापासून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वर्तुळात देखील अस्वस्थता आहे.

विशेष म्हणजे वडेट्टीवार व धानोरकर या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांकडे बोट दाखवून भाजपात जाणार असल्याची बतावणी केली जात आहे. लोकसभेची तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, काँग्रेसने तरूणांना संधी द्यावी असे मत शिवानी वडेट्टीवार माध्यमांकडे व्यक्त करित आहे. तर विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी सुध्दा मुलीच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. मात्र एकाच कुटूंबातून दोन उमेदवार येत असल्याने आम आदमी पार्टीने शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर येताच काँग्रेसने कमजोर उमेदवार दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून कुणबी समाजाचे मनोहर पाऊणकर, दिनेश चोखारे , माजी खासदार बाळू धानोरकर यांच्यासह विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याची सुपारी जिल्ह्यातील काँग्रेसच्या एका नेत्याने घेतल्याची टीका समाज माध्यमावर करताना वडेट्टीवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. तर तिवारी एका समाजावर अशा प्रकारे पोस्ट करून जातीय तणाव वाढवीत आहे. समाज समाजात भांडण लावत आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तिवारी यांना पदमुक्त करावे अशी मागणी प्रदेश प्रतिनिधी प्रवीण पडवेकर यांनी केली आहे.

हेही वाचा……अन् शरद पवार म्हणाले, “राजकारण बाजूला ठेव…”; नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितला ‘तो’ किस्सा

शिवानी वडेट्टीवार रविवार १० मार्च रोजी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ घेऊन दिल्ली येथे जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्यासह काही नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. लोकसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात सुरू असलेली अंतर्गत धुसपूस बघता काँग्रेस श्रेष्ठींनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना १२ मार्च रोजी दिल्लीला बोलावून घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दिल्लीत नेमकी काय खलबते होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar put forward the name of his daughter for chandrapur lok sabha constituency local congress members expresses displeasure rsj 74 psg