वर्धा : पावसाळ्यात अनेक गाव रस्ते पूराने ठप्प पडतात. तर नाल्यांना पूर आला किंवा पुलावरून पाणी वाहू लागल्यास वाहतूक बंद पडते. अश्या वेळी काही गावे संपर्क विहीन होतात. त्यास पर्याय नसतो. म्हणून अश्या ठिकाणी पक्के व ठराविक उंचीचे पूल बांधणे गरजेचे ठरते. तसे झाल्यास परत वाहतूक खोळंबा ठरलेलाच.
वर्धा जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात अनेक मार्ग बंद पडत असतात. पण पूल काही केल्या होत नाही. म्हणून आता काही ठिकाणी काम मार्गी लागत असल्याचे दिसून येते. परिणामी वाहतूक वळती करण्यात आली आहे. पुलगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तसे सूचित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील देवळी – दहेगाव – पुलगाव ते अमरावती जिल्हा सीमा यांस जोडणारा पूल जीर्ण झाला आहे. म्हणून नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक वळती करण्याचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयास देण्यात आला. वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या अनुषंगाने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी दुचाकी वाहतूक व पायदळ रहदारी टाळावी म्हणून आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित केले.
प्रस्तावित वळणमार्ग निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर म्हणजे या पुलापासून साडे चार किलोमीटर अंतरावर वाहतूक वळती होत आहे. आजपासून पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा वळण रस्ता वाहतूकसाठी उपलब्ध राहणार. सदर वाहतुकीचे नियंत्रण करण्याबाबत वाहतूक पोलिसांना सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आठ, दहा गावातील ग्रामस्थ तसेच अमरावतीकडे जाणारे प्रवासी आता काही काळ तरी फेऱ्याचा प्रवास करण्यास बाध्य झाले आहे. हा पूल केव्हा पूर्ण होणार, याबाबत बांधकाम विभाग किंवा महसूल प्रशासन स्पष्ट मत मात्र देत नाही.
येथील आमदार राजेश बकाने हे म्हणतात की या मतदारसंघात पावसामुळे नेहमीच वाहतुकीचा विचका होतो. अनेक वर्षांपासून समस्या आहेत. हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ व या मार्गावर पूल नसल्याने लोकं त्रस्त आहेत. या अडचणी मी सहा महिन्यापूर्वीच तपासल्या. त्या दूर करण्यासाठी काही कामे मार्गी लावली. आता काही कामे सूरू झाली. उर्वरित कामांसाठी निधी व अन्य बाबतीत पाठपुरावा सूरू आहे. पावसाळा असल्याने मी लक्ष ठेवून आहेच. तसेच आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. देवळी पुलगाव क्षेत्रात बदल दिसून येईल, ही खात्री देतो.