अकोला : वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मेहनतीने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे प्रतीक ठरलेल्या ‘वाशीम शेती शिल्प’ या स्थानिक कृषी ब्रँड तयार केला. त्या अंतर्गत चिया बियाण्यांचे उत्पादन करण्यात आले आहे. त्याचे नमुने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी भेट स्वरूपात सादर केले. वाशीम जिल्ह्यात हा उपक्रम हाती घेत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला राज्यस्तरावर पोहोचवण्याची दिशा मिळाली आहे.

वाशीम जिल्हा कृषी प्रधान असून, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनामध्ये आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील दर्जेदार शेतमालाचा ‘वाशीम शेती शिल्प’ हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. या अंतर्गत उत्पादित होणारी चिया बियाणे ही एक पोषण मूल्यांनी समृद्ध आणि बाजारात मागणी असलेली नगदी पीक मानले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीद्वारे केवळ वाशीमच्या कृषी उत्पादनांना मान्यता मिळाली नाही, तर शेतकऱ्यांच्या परिश्रमालाही शासन पातळीवर गौरव झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे हा उपक्रम मांडताना सांगितले की, ‘शेतकऱ्यांचे उत्पादन हे दर्जेदार असून, योग्य विपणन आणि शासनाची साथ मिळाल्यास त्यांचा आर्थिक स्तर उंचावता येईल.’

बाजारपेठेची साखळी निर्माण केली जाणार

‘वाशीम शेती शिल्प’ या ब्रँड अंतर्गत पुढील काळात इतरही उत्पादनांना स्थानिक ओळख देत बाजारपेठेची साखळी निर्माण केली जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांमध्येही नव्या प्रेरणेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

राज्यात चिया लागवडीत वाशीम अग्रेसर

वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच लागवडीच्या नव्या वाटा निवडत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया पिकाने अल्पावधीतच आकर्षित केले. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चिया लागवडीकडे बळीराजा वळत असून जिल्ह्यात तीन हजार ६०८ हेक्टरवर उत्पादन घेतले गेले. चिया लागवडीसाठी योग्य जमीन आणि काळाची निवड, कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्यासाठीच्या पद्धती सोबतच सेंद्रिय लागवड करण्याचे फायदे आहेत. चियाला ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. याचे बियाणे पोषणतत्वांनी समृद्ध आहेत. हृदयविकार टाळण्यात मदत, साखर नियंत्रणाससह ‘अँटीऑक्सिडंट्स’ त्वचेसाठी उपयुक्त आहेत. वाशीम जिल्हा हे चिया उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे आणि सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले.