नागपूर: सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ही नियमित प्रशासकीय बाब आहे. दर तीन वर्षांनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. सत्ताबदल झाला तरी मर्जीतील अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात नेण्याचा प्रघात आहे. राज्यात सत्ताबदल बदल झाल्यावर मोठ्या प्रमाणात सनदी व इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. नागपूर त्याला अपवाद नाही. मात्र येथे बदलून आलेल्या काही अधिका-याचे नांदेड कनेक्शन सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
नागपूरला जिल्हाधिकारीपदावर बदली होऊन आलेले डॉ. विपीन इटनकर हे नांदेड येथूनच आले. तेथे ते जिल्हाधिकारी होते. तेथून त्यांची नागपूरला बदली झाली. त्यानंतर नांदेडचेच निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुळकर्णी यांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली.
आता मंगळवारी २९ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातीलच देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्म्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्या २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. या पूर्वी नांदेडचे काही पोलीस अधिकारी अधिकारी सुध्दा नागपूरमध्ये बदली होऊन आले आहेत.