चंद्रपूर : बल्लारशा रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दूर्घटनेप्रकरणी मध्य रेल्वे विभाग मुंबईचे (पीसीटीई) राजेश अरोरा यांनी सहायक विभागीय अभियंता (एडीईएम) सुबोध कुमार व नरेंद्र नागदेवे या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, रेल्वे पादचारी पुल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत एकूण ४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

पादचारी पुलाचा काही भाग खचल्याने २० फुटांवरून एकूण २२ प्रवासी रेल्वे रुळावर खाली पडले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. दुर्घटनेवेळी रुळावरून रेल्वेगाडी धावत नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सात महिन्यांपूर्वी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. तेव्हा पुलाला आणखी दोन वर्षे काहीही धोका नाही, असा अहवाल देण्यात आला होता. प्रत्यक्षात पुलाचे लोखंडी रॉड पूर्णतः कमकुवत झाले होते. त्यामुळेच ही दुर्घटना घडली.

हेही वाचा: चंद्रपूर: अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच पादचारी पूल कोसळला!; दोन अधिकारी निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुगंटीवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. याची दखल घेत रेल्वे विभागाने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी इन्स्पेक्टर ऑफ वर्क (आयओडब्ल्यू) जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव या दोघांना निलंबित केले. आता सहायक विभागीय अभियंता सुबोध कुमार व नरेंद्र नागदेवे या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.