यवतमाळ : स्त्री शक्तीचा जागर म्हणून ओळख असलेल्या दुर्गोत्सवाची जय्यत तयारी जिल्ह्यात झाली आहे. यवतमाळचा दुर्गोत्सव हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. यावर्षी जिल्ह्यात तीन हजार ८०० दुर्गोत्सव मंडळ आणि ६०० शारदोत्सव मंडळांनी नोंदणी केली आहे. विदर्भासह राज्यभरातून आणि परप्रांतातूनही भाविक यवतमाळ येथे नवरोत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी येतात.

त्या अनुषंगाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक आठवडी बाजारातील शितलादेवी यवतमाळची ग्रामदेवता आहे. येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुर्गोत्सव साजरा होत आहे. हिंदुस्थानी दुर्गादेवी मंडळ गेल्या ८७ वर्षांपासून येथील नवरात्रोत्सव साजरा करत आहे.

डोक्यावर दूरवरून पाण्याचा हंडा घेवून पायी चालत आलेल्या महिला येथे देवीला नऊ दिवस जलार्पण करतात. या शिवाय विविध देखाव्यांसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. यावर्षीसुद्धा अनेक मंडळांनी प्रेक्षणीय देखावे साकारले आहे. छोटी गुजरी चौकात एकता दुर्गोत्सव मंडळाने राजस्थानमधील राणीसत मंदिराचा देखावा साकारला आहे. दर्डा नाका परिसरातील शिवराय दुर्गोत्सव मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिराचा देखावा साकारला आहे.

वडगाव रोड येथील सुभाष क्रीडा मंडळाने अयोध्याचे राममंदिर, सिद्धीविनायक नगरातील जगदंबा दुर्गोत्सव मंडळ तिरूपती बालाजी मंदिर, सरस्वती नगरातील एकविरा दुर्गोत्सव मंडळाने प्राचीन गुफा, विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठलरूपात देवी आणि वारकारी संप्रदाय देखावा, विठ्ठलवाडी भाग तीनमध्ये गुफेतून बारा ज्योतिर्लिंग दर्शन, दारव्हा रोडवरील मातोश्री दुर्गोत्सव मंडळाने पंढरपूरमधील नामदेवद्वाराचा देखावा तर संकट मोचन परिसरातील जय भवानी दुर्गोत्सव मंडळाने ७१ फूट प्राचीन मंदिराचा, शिवाजी नगर दुर्गोत्सव मंडळाने केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे.

या शिवाय दत्त चौकातील स्व. बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाने गेल्या ५० वर्षांपासून अखंड दीप तेवत ठेवला आहे. येथे नित्यनेमाने पूजा विधी केले जातात. आझाद मैदानातील गुजराती दुर्गोत्सव मंडळ दांडिया, गरबा करीता ओळखले जाते. या ठिकाणी ४१ किलो चांदीची दूर्गा मूर्ती साकरली आहे, तर गरबा, दांडिया खेळण्यासाठी ३० हजार स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे.

घटस्थापनेनंतर तिसऱ्या दिवसापासून शहरात दुर्गोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी एक अधिसूचना काढून २३ सप्टेंबरपासून ४ ऑक्टोबरपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. या काळात शहरात जड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. तर नागपूर, धामणगाव, दारव्हा, आर्णी मार्गावरील वाहतूक लोहारा, भोयर या बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आली आहे.

आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रबोधन अंतर्गत आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील तीन उत्कृष्ट मंडळांना प्रशिस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देण्यात येणार आहे. दुर्गादेवी मंडळांची निवड करण्यासाठी ११ सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, ही समिती जिल्ह्यातील मंडळांची पडताळणी करून निकष पूर्ण करणाऱ्या मंडळांना गुणांकन करणार आहे. डीजे व नशामुक्त मंडळांना विशेषत्वाने गौरविण्यात येणार आहे.