यवतमाळ : येथील हल्दीरामच्या स्टोअरमधून मिठाई घेतल्यानंतर हवाबंद डब्यातील मिठाई बुरशीयुक्त आढळली. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षासोबतच हा प्रकार घडल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले. या प्रकरणी अन्न व औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ पावले उचलत यवतमाळ येथील हल्दीराम स्टोअरला कारणे दाखवा नोटीस बजावली. शहरातील महादेव मंदिर रोड परिसरात हल्दीराम स्टोअर ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. मार्फत चालविल्या जाते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी मंगळवारी या स्टोअरमधून काजू चॉकलेट रोल ही मिठाई घेतली.

त्यासाठी ३०५ रूपयाचे बील ऑनलाइन दिले. घरी गेल्यानंतर त्यांची मुलगी ही मिठाई खात असताना त्यात बुरशी आढळली. त्यांनी मुलीला ही मिठाई खाण्यापासून रोखले. मिठाईचा डब्बा घेवून ते येथील अन्न व औषध प्रशासन विभागात पोहोचले. बुरशीयुक्त मिठाईचा डब्बा सहायक आयुक्तांना भेट देत हल्दीराम स्टोअरवर कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनातून केली.

हेही वाचा : ठरलं! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा ‘येथे’ होणार…

सर्वत्र पाऊस व रोगराईचे थैमान सूरू असताना बुरशीयुक्त मिठाईची विक्री करून खाद्यपदार्थातील विषबाधेने नागरीकांना मरणाच्या दारात लोटण्याचे काम हल्दीरामसारखी नामांकित खाद्य कंपनी करत असल्याचा आरोप नीरज वाघमारे यांनी केला आहे. वाघमारे यांच्या तक्रारीनंतर अन्न व औषधे प्रशासनाचे सहायक आयुक्त गोपाल माहोरे व त्यांच्या पथकाने स्थानिक हल्दीराम स्टोअरमध्ये धडक देवून तेथील मिठाईचे नमुने घेतले.

येथे विक्री होणारी मिठाई नागपूर येथून येत असल्याने या प्रकरणी नागपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागास कळविण्यात आले असून स्थानिक हल्दीराम स्टोअरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांनी सांगितले. या प्रकरणी नागपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभाग काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : शाळेसमोरील मार्ग, की ‘यममार्ग’? नागपूरच्या अजनी रेल्वे मेन्स शाळेसमोरील वळण विद्यार्थ्यांसाठी धोकादायक…

हल्दीराम स्टोअरमधील खाद्य पदार्थांबाबत यापूर्वी नागपूर येथेही अशाच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यवतमाळातील हल्दीराम स्टोअरमधील सर्वच खाद्य पदार्थांची तपासणी करण्याची मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी केली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हल्दीराम या दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणीही नीजर वाघमारे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे.

हेही वाचा : नागपूर: सिमेंटची परराज्यातील वाहनांवर मालवाहतूक केल्यास… ट्रान्सपोर्ट व्यवसायिक म्हणतात..

सर्वत्र भेसळयुक्त पदार्थांची विक्री

शहरात सर्वत्र भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करत नसल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला आहे. पंचतारांकित खाद्यविक्री स्टोअरची ही अवस्था असेल तर शहरातील इतर मिठाई विक्री दुकानांची अवस्था कशी असेल, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे.